Monday , September 21 2026
Breaking News

हिरेण्यकेशी नदीच्या पाणी प्रवाहात वाढ; धुपदाळ जलाशयातून पाण्याचा विसर्ग

Spread the love

 

बेळगाव : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे हिरेण्यकेशी आणि घटप्रभा नद्यांमध्ये पाण्याची आवक वाढली असून, त्याचा परिणाम म्हणून धुपदाळ जलाशय पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे जलाशयातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.
रविवारी सकाळी मंत्री जारकीहोळी यांनी घटप्रभा परिसरातील धुपदाळ जलाशयाला भेट देऊन जलाशयातील पाण्याची पातळी, आवक आणि पाणी व्यवस्थापनाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक सूचना दिल्या.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, यंदा मान्सून उशिरा सुरू झाल्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने हिरेण्यकेशी आणि घटप्रभा नद्यांतील पाण्याची आवक लक्षणीयरीत्या वाढली आहे. सध्या धुपदाळ जलाशयात सुमारे ८ हजार क्यूसेक पाण्याची आवक होत असून, अतिरिक्त पाणी घटप्रभा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे बेळगाव ते बागलकोटपर्यंत नदीचा प्रवाह सुधारला असून, बागलकोट जिल्ह्यापर्यंत हे पाणी पोहोचले आहे.
शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून रविवारी सकाळपासून घटप्रभा डाव्या कालव्यात १ हजार क्यूसेक पाणी सोडण्यात आले असून, संध्याकाळपर्यंत हा विसर्ग २ हजार क्यूसेक करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. यामुळे सुमारे २ लाख हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार असून, खरीप हंगामातील शेतीकामांना मोठी मदत मिळणार आहे.
पुढील काही दिवसांतील पावसाचा अंदाज निश्चितपणे सांगता येत नसल्याने उपलब्ध पाण्याचा काटकसरीने आणि योग्य नियोजनाने वापर करण्याचे आवाहनही मंत्री जारकीहोळी यांनी शेतकऱ्यांना केले. तसेच जिल्ह्यात पिण्याचे पाणी आणि सिंचनासाठी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असून, जलाशयातील पाण्याची पातळी आणि आवक यावर सातत्याने लक्ष ठेवले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *