Sunday , September 20 2026
Breaking News

शाळा क्र. १९च्या प्रभारी मुख्याध्यापिका सविता चंदगडकर-निकम यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त कृतज्ञतेचा अविस्मरणीय सोहळा

Spread the love

 

बेळगाव : काळाच्या ओघात अनेक चेहरे येतात आणि निघून जातात. मात्र काही व्यक्तिमत्त्वे आपल्या कार्याचा असा अमिट ठसा उमटवून जातात की, त्यांची ओळख केवळ एका पदापुरती मर्यादित राहत नाही, तर ती अनेक पिढ्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनते. विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करत, संस्कारांची बीजे रुजवत आणि शिक्षणाला माणुसकीची जोड देत तब्बल ३२ वर्षे अखंड सेवा बजावणाऱ्या सरकारी मराठी मुलांची शाळा क्रमांक १९, शहापूर येथील प्रभारी मुख्याध्यापिका सौ. सविता चंदगडकर-निकम यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित सत्कार समारंभ भावनांनी ओथंबून गेला.

हॉटेल न्यू उदय भुवन येथे वेदांत फाऊंडेशन व गुरुस्पंदन यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या सोहळ्यात बेळगाव तालुका शिक्षक सोसायटीचे माजी अध्यक्ष, विद्यमान संचालक तथा मराठा शिक्षक संघाचे गौरवाध्यक्ष शेखर करंबळकर यांनी सविता चंदगडकर-निकम यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले, “प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दोन दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात—एक जीवनप्रवासाची सुरुवात करणारा आणि दुसरा त्या प्रवासाला सन्मानाने पूर्णविराम देणारा. ८ ऑगस्ट १९९४ रोजी शिक्षक म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज ३२ वर्षांनंतरही तेवढ्याच उत्साहाने, समर्पणाने आणि विद्यार्थ्यांवरील अपार प्रेमाने उजळून निघाला आहे. हेच त्यांच्या यशाचे खरे गमक आहे.”

सत्काराला उत्तर देताना सौ. सविता चंदगडकर-निकम यांच्या भावना अनावर झाल्या. त्या म्हणाल्या, “शाळा हा केवळ व्यवसाय नाही, ती एक भावना आहे. शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांना ज्ञान देतो, तेव्हा तो त्यांच्या भविष्याची, स्वप्नांची आणि ध्येयाची पेरणी करत असतो. ही जाणीव मनाशी बाळगून मी गेली ३२ वर्षे सेवा केली. आज तुम्ही दिलेला हा सन्मान माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. या प्रेमाचे ऋण मी कधीही फेडू शकणार नाही.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वेदांत फाऊंडेशनचे संस्थापक सतीश पाटील यांनी केले, तर स्वागत मारुती तमुचे यांनी केले. कार्यक्रमात विविध मान्यवरांनी सविता चंदगडकर-निकम यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या समर्पित सेवेला सलाम केला.

यावेळी अध्यक्षस्थानी शेखर करंबळकर होते. प्रमुख अतिथी म्हणून वेदांत फाऊंडेशनच्या अध्यक्षा जयश्री पाटील, सतीश पाटील, लक्ष्मणराव निकम, आप्पाणा यळूरकर, आस्मा नाईक, आनंद काद्रोळी, संजय चिगरे, माधुरी, सुनील देसुरकर, असीफ अत्तार, देवेंद्र पाटील, विनायक गावडे, शेखर चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि शिक्षणप्रेमींनी उपस्थित राहून आपल्या लाडक्या शिक्षिकेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा अंबेवाडीकर यांनी केले, तर जयश्री पाटील यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *