Sunday , September 20 2026
Breaking News

बेळगावात मुसळधार पावसाचा इशारा; संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन हाय अलर्टवर

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी जिल्हा विपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत संबंधित विभागांना आवश्यक तयारी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने पूरग्रस्त भागातील नागरिकांना आवश्यकतेनुसार सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यासाठी बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच एसडीआरएफ आणि अग्निशामक दलाला २४ तास सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ग्रामीण भागातील कोसळलेले वीजखांब, रोहित्र आणि वीजवाहिन्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले असून, स्थानिक स्वराज्य संस्थांनी धोकादायक व पडक्या घरांचे सर्वेक्षण करून गरज भासल्यास नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. जनावरांच्या चाऱ्याचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्यावरही भर देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील धरणांमधून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गावर लक्ष ठेवण्यासाठी आणि तेथील प्रशासनाशी समन्वय राखण्यासाठी बेळगाव जिल्ह्यातून विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.

पावसामुळे उद्भवणाऱ्या साथीच्या रोगांचा धोका लक्षात घेऊन आरोग्य विभागाने जनजागृती मोहीम राबवावी, पूरग्रस्त भागात औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा तसेच दूषित पाण्याचे स्रोत तातडीने बंद करावेत, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्ह्यात एसडीआरएफच्या ५, अग्निशामक दलाच्या ९ आणि विविध तालुक्यांतील २७ अशा एकूण ४१ बोटी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांसाठी ३९७ मदत केंद्रे आणि जनावरांसाठी १२९ छावण्यांची ठिकाणे निश्चित करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

बैठकीस पोलीस आयुक्त भूषण भोरसे, जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी रोहित सिंग यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *