Sunday , July 26 2026
Breaking News

एनडब्ल्यूकेएसआरटीसीची विशेष ‘वर्षा पर्यटन’ बससेवा ११ जुलैपासून 

Spread the love

 

बेळगाव : जुलै महिना सुरू होताच पश्चिम घाट परिसर हिरवाईने नटतो, डोंगरकपारींमधून फेसाळणारे धबधबे कोसळू लागतात, जलाशय तुडुंब भरून वाहू लागतात आणि निसर्गप्रेमींना वर्षा पर्यटनाची मोहिनी घालू लागतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही या निसर्गसौंदर्याचा आनंद सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने घेता यावा, यासाठी उत्तर पश्चिम कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एनडब्ल्यूकेएसआरटीसी) यांनी ११ जुलै ते ३० ऑगस्ट या कालावधीत विशेष ‘वर्षा पर्यटन पॅकेज’ जाहीर केले आहे.

सध्या जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू असून धबधबे फेसाळत आहेत, तर जलाशय ओसंडून वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर पर्यटकांना निसर्गाच्या सान्निध्यात अविस्मरणीय अनुभव देण्यासाठी ही विशेष बससेवा सुरू करण्यात आली आहे.

या पॅकेज अंतर्गत प्रत्येक दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी, प्रत्येक रविवारी तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी बेळगावच्या मध्यवर्ती बस स्थानकातून सकाळी ९ वाजता विशेष बस सुटणार आहे. या पर्यटन फेरीमध्ये हिडकल जलाशय, गोडचिनमलकी धबधबा आणि गोकाक धबधबा या निसर्गरम्य स्थळांना भेट देण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. दिवसभर वर्षा पर्यटनाचा मनमुराद आनंद घेतल्यानंतर ही बस सायंकाळी ६ वाजता पुन्हा बेळगावला परतणार आहे.

या विशेष पॅकेजमध्ये संपूर्ण प्रवासाचा समावेश असून प्रति प्रवासी केवळ २३० रुपये इतकेच नाममात्र भाडे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच निसर्गप्रेमींसाठी हा वर्षाविहार अत्यंत किफायतशीर ठरणार आहे.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्यवर्ती बस स्थानकात आगाऊ तिकीट आरक्षणाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुकांनी वेळेत तिकीट आरक्षित करून या विशेष वर्षा पर्यटनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाने केले आहे.

यंदाच्या पावसाळ्यात अविस्मरणीय वर्षा पर्यटनाचा अनुभव घ्यायचा असेल, तर एनडब्ल्यूकेएसआरटीसीची ही विशेष बससेवा पर्यटकांसाठी पर्वणीच ठरणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *