Monday , September 21 2026
Breaking News

धावत्या बसमधून थुंकलात तर दंड अटळ!

Spread the love

 

एनडब्ल्यूकेआरटीसीचा कठोर निर्णय; प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

बेळगाव : बस प्रवास अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि शिस्तबद्ध करण्यासाठी उत्तर पश्चिम कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एनडब्ल्यूकेआरटीसी) ने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे धावत्या बसमध्ये तंबाखू, गुटखा किंवा पानमसाल्याचे सेवन करून खिडकीतून थुंकणाऱ्या प्रवाशांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून दंडही वसूल केला जाणार असून, यासाठी विशेष अंमलबजावणी मोहीम राबविण्यात येणार आहे.

या निर्णयामागे अलीकडेच घडलेली एक दुर्दैवी घटना कारणीभूत ठरली आहे. बसमधून थुंकण्यासाठी खिडकीबाहेर डोके काढलेल्या १७ वर्षीय विद्यार्थ्याला मागून भरधाव येणाऱ्या टिप्परची धडक बसल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या हृदयद्रावक घटनेनंतर अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी महामंडळाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

महामंडळाच्या मते, धावत्या बसमध्ये तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून खिडकीतून थुंकणे ही केवळ अस्वच्छ सवय नसून, ती इतर प्रवाशांच्या सुरक्षिततेलाही गंभीर धोका निर्माण करते. अनेकदा थुंकण्यासाठी प्रवासी खिडकीबाहेर डोके किंवा शरीराचा भाग काढतात आणि त्यातून जीवघेणे अपघात घडण्याची शक्यता वाढते. त्यामुळे अशा निष्काळजीपणाला आता कोणतीही मुभा दिली जाणार नाही.

या मोहिमेअंतर्गत बस प्रवासादरम्यान तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करताना किंवा खिडकीतून थुंकण्याचा प्रयत्न करताना आढळणाऱ्या प्रवाशांवर तातडीने दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. बसवाहक आणि इतर कर्मचाऱ्यांना नियमभंग करणाऱ्यांवर लक्ष ठेवून त्वरित कारवाई करण्याचे निर्देश देण्यात येणार आहेत.

महामंडळाने स्पष्ट केले आहे की, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण, बसची स्वच्छता आणि प्रवाशांच्या जीविताची सुरक्षा या तिन्ही बाबींना प्राधान्य देत या नियमांची कठोर अंमलबजावणी केली जाईल. दंडाची रक्कम आणि अंमलबजावणीची कार्यपद्धती लवकरच जाहीर करण्यात येणार असून, बसस्थानके आणि बसमध्ये जनजागृतीपर सूचना फलकही लावले जाणार आहेत.

“धावत्या बसमध्ये खिडकीबाहेर डोके काढणे किंवा थुंकण्याचा प्रयत्न हा क्षणिक निष्काळजीपणा नसून जीवावर बेतणारा प्रकार ठरू शकतो,” असा स्पष्ट इशारा महामंडळाने दिला आहे. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाने सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करून स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता जपावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *