Monday , September 21 2026
Breaking News

सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात ताकदीने बाजू मांडणार : प्रकाश मरगाळे 

Spread the love

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर महाराष्ट्र सरकारने ठाम भूमिका घेत सर्वोच्च न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडण्याचा निर्धार व्यक्त केला असल्याचे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी बैठकीनंतर बोलताना सांगितले.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मागणीनुसार महाराष्ट्र सरकारच्या उच्चाधिकार समितीची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी मुंबईतील विधान भवन येथे पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्राताई पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार, उच्चाधिकार समितीचे सदस्य तसेच मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. या बैठकीकडे बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांचे विशेष लक्ष लागले होते.

बैठकीनंतर माहिती देताना मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी सांगितले की, सीमा प्रश्नावर सकारात्मक आणि सविस्तर चर्चा झाली. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राची बाजू अधिक भक्कमपणे मांडण्यासाठी तीन वरिष्ठ वकिलांची नियुक्ती करण्याबाबत एकमत झाले.

याशिवाय, महाराष्ट्रातील खासदारांनी संसदेत सीमा प्रश्न सातत्याने उपस्थित करून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या न्याय्य मागण्यांना आवाज द्यावा, यावरही बैठकीत सहमती झाली. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन सीमा प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांवरील कथित अत्याचार, घटनात्मक हक्कांची पायमल्ली आणि अन्य संबंधित प्रश्नांवर विधी तज्ज्ञांशी चर्चा करून पुढील कायदेशीर आणि प्रशासकीय पावले उचलली जातील, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आल्याची माहिती प्रकाश मरगाळे यांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *