Sunday , September 20 2026
Breaking News

प्लास्टिकमुक्त बेळगावासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक : मदन बामणे

Spread the love

 

रोटरॅक्ट क्लब ऑफ बेळगाव साऊथच्या वतीने ‘प्लास्टिक फ्री डे’ निमित्त श्री कलमेश्वर हायस्कूल, सावगाव येथे मदन बामणे यांचे प्रेरणादायी व्याख्यान

सावगाव : रोटरॅक्ट क्लब ऑफ बेळगाव साऊथच्या वतीने जागतिक प्लास्टिक फ्री डे निमित्त श्री कलमेश्वर हायस्कूल, सावगाव येथे पर्यावरण जनजागृतीपर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पर्यावरणप्रेमी व संजीविनी फाउंडेशनचे चेअरमन मदन बामणे यांनी विद्यार्थ्यांना प्लास्टिकमुक्त जीवनशैलीचा संदेश देत पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व पटवून दिले.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर रोटरॅक्ट क्लब ऑफ बेळगाव साऊथच्या अध्यक्षा रोटेरियन मोनिका शिंदे, सचिव रोटेरियन मॉरिस विगास, रोटेरियन साक्षी जाडेजा तसेच श्री कलमेश्वर हायस्कूलचे मुख्याध्यापक डी एम भातकांडे, वैष्णवी नेवगिरी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते मदन बामणे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रास्ताविकातून कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट करण्यात आला.

व्याख्यानात बोलताना मदन बामणे यांनी सांगितले की, प्लास्टिकचा वाढता वापर हा पर्यावरणासह मानवी आरोग्यासाठी गंभीर धोका ठरत आहे. गरम अन्न किंवा पेये प्लास्टिकच्या भांड्यातून सेवन केल्यास त्यातील घातक रसायने शरीरात जाऊन विविध आजारांना कारणीभूत ठरू शकतात. भविष्यात दर चार व्यक्तींपैकी एकाला कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतो, तसेच महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले, “मी गेल्या बारा वर्षांपासून प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद केला आहे. प्रत्येकाने किमान सिंगल यूज प्लास्टिकचा वापर बंद केला, तरी पर्यावरण संवर्धनासाठी मोठे योगदान देता येईल. प्लास्टिकमुक्त बेळगाव घडवायचे असेल, तर प्रत्येक नागरिकाने स्वतःपासून सुरुवात करणे आवश्यक आहे.”

हे व्याख्यान केवळ भाषणापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांशी संवादात्मक (Interaction with Students) पद्धतीने पार पडले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारले, आपली मते मांडली आणि चर्चेत सक्रिय सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांकडून पर्यावरण संरक्षणाची शपथ घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी, “आम्ही नेहमी कापडी पिशवीच वापरू. प्लास्टिकच्या कॅरी बॅग, प्लास्टिकचे कप, ग्लास आणि बाटल्यांचा वापर करणार नाही. सिंगल यूज प्लास्टिकला कायमचा नकार देऊ आणि इतरांनाही प्लास्टिकमुक्त जीवनशैलीचा संदेश देऊ,” अशी सामूहिक प्रतिज्ञा केली.

यानंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत भविष्यात प्लास्टिकचा वापर टाळण्याचा निर्धार व्यक्त केला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रभावीपणे पोहोचविणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *