Sunday , July 26 2026
Breaking News

गृहलक्ष्मी लाभार्थी महिलांनी कागदपत्रांसाठी खानापूरला येऊ नये; गावातील अंगणवाडी केंद्रातच कागदपत्रे जमा करा

Spread the love

 

पंच हमी योजनेचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांचे आवाहन

खानापूर : तालुक्यातील गृहलक्ष्मी योजनेच्या लाभार्थी महिलांनी आवश्यक कागदपत्रे जमा करण्यासाठी खानापूर येथील सीडीपीओ कार्यालयात येऊ नये. लाभार्थ्यांनी आपल्या गावातील अंगणवाडी सेविका किंवा शिक्षिकांकडेच कागदपत्रे जमा करावीत. सीडीपीओ कार्यालयात ही कागदपत्रे स्वीकारली जाणार नसल्याने महिलांनी विनाकारण हेलपाटे घालू नयेत, असे पंच हमी योजनेचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी आवाहन केले आहे.

गृहलक्ष्मी योजनेतील लाभार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी आवश्यक नमुना (फॉरमॅट) सर्व अंगणवाडी केंद्रांना पाठविण्यात आला आहे. एखाद्या अंगणवाडी केंद्राला तो प्राप्त झाला नसेल, तर संबंधित सेविकांनी सर्कल अधिकारी किंवा सीडीपीओ कार्यालयाशी संपर्क साधून तो मिळवून लाभार्थ्यांची नोंदणी करावी, असेही त्यांनी सांगितले.

काही अंगणवाडी सेविकांकडे सध्या बीएलओ (Booth Level Officer) संदर्भातील निवडणूक कामकाजाची जबाबदारी आहे. अशा सेविकांनी सदर काम पूर्ण होताच गृहलक्ष्मी योजनेच्या लाभार्थ्यांची कागदपत्रे स्वीकारून नोंदणीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

कोणत्याही लाभार्थी महिलेला अंगणवाडी सेविकांनी कागदपत्रांसाठी खानापूरला पाठवू नये. सूचनांचे पालन न केल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, गृहज्योती (मोफत वीज) योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हेस्कॉमचे अधिकारी घरोघरी जाऊन अर्ज भरून घेणार आहेत. त्यावेळी लाभार्थ्यांनी आधार कार्ड, एक छायाचित्र आणि वीज बिल तयार ठेवावे. भाड्याच्या घरात राहणाऱ्या लाभार्थ्यांनी भाडेकरार, घरमालकाचे आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्राची प्रतही सादर करणे आवश्यक आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर लाभार्थी महिलांनी वेळ आणि खर्च वाचवण्यासाठी आपल्या गावातील अंगणवाडी केंद्रातच कागदपत्रे जमा करून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन सूर्यकांत कुलकर्णी यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

ई-केवायसीसाठी एक रुपयाही देऊ नका; खानापूर तालुका गॅरंटी योजना अध्यक्षांचे आवाहन

Spread the love  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका पंचहमी गॅरंटी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *