Sunday , July 26 2026
Breaking News

सुपीक जमीन रेल्वेसाठी गेली; आता न्याय द्या!

Spread the love

 

बेळगाव-धारवाड रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार; योग्य मोबदला व कुटुंबातील एकाला नोकरीची मागणी

बेळगाव : “विकासाला आमचा विरोध नाही; पण विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांवर अन्याय खपवून घेतला जाणार नाही,” असा ठाम इशारा देत बेळगाव-धारवाड नवीन रेल्वे मार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या सुपीक शेतजमिनींना न्याय्य मोबदला मिळावा, तसेच जमीन गमावलेल्या प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडले. घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडत आंदोलकांनी प्रशासनाला धारेवर धरले.

शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात रेल्वे प्रकल्पासाठी मलप्रभा नदी खोऱ्यातील अत्यंत सुपीक जमीन संपादित करण्यात आली असून, त्या बदल्यात मिळणारी भरपाई अन्यायकारक असल्याचा आरोप करण्यात आला. प्रशासनाने तातडीने भरपाईचे दर फेरनिश्चित करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आंदोलनावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चुन्नप्पा पुजारी यांनी सरकारच्या भरपाई धोरणावर कठोर टीका केली. बिदडी परिसरात एका एकरासाठी तब्बल तीन कोटी रुपयांपर्यंत भरपाई दिली जात असताना, बेळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यापेक्षा अत्यल्प मोबदला दिला जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. एकाच राज्यात भरपाईचे वेगवेगळे निकष लागू करणे हा शेतकऱ्यांवरील अन्याय असल्याचे ते म्हणाले.

शेतकऱ्यांनी सरकारकडे जमीन संपादनाचा मोबदला वाढविण्याबरोबरच प्रकल्पग्रस्त प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला रेल्वे किंवा संबंधित शासकीय विभागात कायमस्वरूपी नोकरी देण्याची मागणी केली. “जमीन गेली, शेती गेली; आता किमान रोजगाराचा आधार तरी द्या,” अशी भावना अनेक आंदोलकांनी व्यक्त केली.

मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला. विकास प्रकल्पांना विरोध नसला तरी शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आणणारा कोणताही निर्णय सहन केला जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

या आंदोलनात प्रकाश नायक, किशन नंदी, प्रेम चौगला, पडीगौडा बागेवाडी, जावेद मुल्ला, मारुती लोकूर, परशुराम जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. घोषणाबाजी आणि निदर्शनांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर काही काळ दणाणून गेला.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *