

शहरात पुन्हा वर्दळ; धोकादायक झाडांचा प्रश्न मात्र कायम
बेळगाव : गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याने बेळगाव शहर व परिसराला अक्षरशः झोडपून काढले होते. मात्र बुधवारी पावसाने उघडीप दिल्याने जनजीवन पुन्हा सुरळीत होऊ लागले. बाजारपेठा, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी पुन्हा वर्दळ दिसू लागली असून नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
सोमवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भाग जलमय झाले होते. झाडे उन्मळून पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला, तर अनेक भागांमध्ये वीजपुरवठाही खंडित झाला. या पार्श्वभूमीवर बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली होती.
बुधवारी सकाळपासून पावसाचा जोर कमी झाल्याने नागरिकांनी घराबाहेर पडण्यास सुरुवात केली. बाजारपेठा, शासकीय कार्यालये आणि व्यावसायिक व्यवहार पुन्हा गतीमान झाले. मात्र पावसामुळे कमकुवत झालेली झाडे अजूनही धोकादायक ठरत आहेत.
महापालिकेने शहरातील 130 धोकादायक झाडे हटविण्यासाठी वन विभागाकडे परवानगी मागितली होती. प्रत्यक्षात मात्र बहुतांश ठिकाणी केवळ फांद्यांची छाटणी करण्यात आल्याने पहिल्याच जोरदार पावसात कॅम्प, वडगाव-वेंगुर्ला रोड, भाग्यनगर, मारुती गल्ली आणि सोन्यामारुती चौक परिसरात झाडे कोसळली. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी महापालिकेच्या कारभारावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
पावसाने तात्पुरती विश्रांती दिली असली तरी धोकादायक झाडांचा प्रश्न कायम आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta