Sunday , September 20 2026
Breaking News

राकसकोपला आठ दिवसांत १२ फूट पाणीसाठा; बेळगावकरांना तात्पुरता दिलासा

Spread the love

 

जलाशय पूर्ण भरण्यासाठी अजून १७ फूट पाण्याची गरज  

बेळगाव : शहरावर ओढावलेल्या भीषण पाणीटंचाईच्या संकटादरम्यान १ ते ८ जुलैदरम्यान झालेल्या संततधार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयात तब्बल १२ फूट पाणीसाठ्याची वाढ झाली आहे. त्यामुळे बेळगावकरांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजूनही सुमारे १७ फूट पाण्याची आवश्यकता असल्याने पावसाकडेच सर्वांचे डोळे लागले आहेत.

राकसकोप जलाशयातील पाण्याची पातळी वाढल्याने सायफन पद्धतीने पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे तात्पुरती परिस्थिती सुधारली असली, तरी शहराची दीर्घकालीन पाणीटंचाई दूर करण्यासाठी दमदार पावसाची नितांत गरज आहे. राकसकोप जलाशय २४७६ ते २४७७ फूट पातळीवर भरतो. सध्या मात्र जलाशयातील पाण्याची पातळी २४५०.८० फूट इतकीच आहे.

दुसरीकडे, हिडकल जलाशयात गुरुवारी १५.६३७ टीएमसी इतका पाणीसाठा नोंदविण्यात आला असून २८,६०३ क्युसेक पाण्याची आवक सुरू होती. तरीही गतवर्षीच्या तुलनेत दोन्ही जलाशयांतील पाणीसाठा कमी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे दोन्ही जलाशय पूर्ण क्षमतेने भरल्यानंतरच शहराच्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय होणार आहे.

गेल्या चार दिवसांत झालेल्या मुसळधार पावसानंतर बुधवारपासून पावसाने पुन्हा विश्रांती घेतली आहे. गुरुवारी दिवसभर केवळ तुरळक सरी कोसळल्या, तर अधूनमधून सूर्यदर्शनही झाले. यंदा जून महिना जवळपास कोरडाच गेल्यानंतर जुलैच्या सुरुवातीला पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने जलाशय भरण्याचा वेग पुन्हा मंदावला आहे.

सध्या बेळगाव शहरात दहा ते बारा दिवसांतून एकदाच आणि तेही अवघ्या तीन ते चार तासांसाठी पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असून, आगामी दिवसांत दमदार पाऊस झाल्यासच शहराची पाणीटंचाईची समस्या दूर होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *