

महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन: शेतवाडीतील रस्तेदुरूस्तीसाठी पीडीओना निवेदन देणार
येळ्ळूर : कर्नाटक राज्यात सध्या सुरू असलेल्या मतदार यादी पुनर्रचना (SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर, येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने ब्रम्हलिंग मंदिर येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मतदार यादीतील त्रुटी दूर करणे, नवीन नावांची नोंदणी आणि सीमाभागातील मराठी भाषिकांचे मतदान टिकवून ठेवण्यासाठी जनजागृती करणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री. बंडू शेषराव पाटील हे होते.
प्रारंभी सेक्रेटरी प्रकाश अष्टेकर यांनी प्रास्ताविकात, मतदार यादी पुनर्रचना प्रक्रियेत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी जातीने लक्ष घालून कार्य करण्याचे आवाहन केले.
बैठकीमध्ये उपस्थित विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि मतदार यादीच्या प्रक्रियेवर प्रकाश टाकला. यामध्ये प्रामुख्याने येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष दुध्दप्पा बागेवडी यांनी, आगामी काळात सीमाभागातील मराठी अस्मिता आणि राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ही प्रक्रिया अतिशय महत्त्वाची असल्याचे सांगितले.
उपाध्यक्ष राजू पावले, उपखजिंदार नागेंद्र पाखरे, समितीचे युवा कार्यकर्ते सागर पाटील तसेच भीमराव पुण्यनावर, प्रकाश पाटील आणि सूरज गोरल यांनी आपले विचार मांडले आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

बूथ लेव्हल कार्यकर्त्यांची (BLA) नियुक्ती
प्रत्येक मतदान केंद्रावर (बूथ लेव्हल) मराठी मतदारांना मदत करण्यासाठी, नवीन नावांची नोंदणी करण्यासाठी आणि प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी समितीच्यावतीने सक्रिय कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या.
सीमाभागातील प्रत्येक मराठी बांधवाने आपले आणि आपल्या कुटुंबाचे नाव मतदार यादीत अचूक असल्याची खात्री करावी, असे आवाहन या बैठकीच्या माध्यमातून समितीने केले आहे.
सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी उच्चाधिकार कमिटीच्या बैठकीत सीमाप्रश्नाचा लढा ताकतीने लढण्याचा निर्धार केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव संमत झाला.
सध्या शेतीची कामे अत्यंत जोमाने सुरू आहेत. अशा वेळी शेतकऱ्यांना शेतात ये-जा करताना अडचण येऊ नये, म्हणून येळ्ळूरच्या पीडीओ (PDO – पंचायत विकास अधिकारी) यांना निवेदन देण्याचा ठराव या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. शेतातील पायवाटांची व रस्त्यांची दुरुस्ती त्वरित व्हावी, जेणेकरून शेतकऱ्यांची गैरसोय दूर होईल, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली जाणार आहे.
शिवाजी कदम यांनी आभार मानले.
या बैठकीला सतिश देसूरकर, बाळकृष्ण धामणेकर, कृष्णा बिजगरकर, मल्लाप्पा संभाजीचे, राममभाऊ पाखरे, आनंद कंग्राळकर, बाळकृष्ण पाटील, परशुराम पाटील, भरमान्ना कंग्राळकर, नेताजी गोरल, यल्लुप्पा पाटील, प्रदीप देसाई, राहुल सुळेभावी, अक्षय देसाई, विनोद पाखरे, परशुराम कुंडेकर, भुजंग संभाजीचे, सचिन साळुंखे, अनिल ग. पाटील, परशुराम कणबरकर, प्रसन्ना सुळगेकर, रितेश पावले, नंदकुमार पाटील, बी. एन. मजुककर, दयानंद उघाडे आणि वैभव कामत आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta