Monday , September 21 2026
Breaking News

भारत विकास परिषदेचा स्थापना दिवस अपूर्व उत्साहात

Spread the love

 

राष्ट्रीय संगठन मंत्री सुरेश जैन यांची उपस्थिती

बेळगाव : भारत विकास परिषद बेळगाव शाखेच्यावतीने परिषदेचा ६४ वा स्थापना दिवस अत्यंत उत्साहात व प्रतिष्ठेने जीजीसी सभागृहात शुक्रवारी सायंकाळी साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून दिल्लीहून भारत विकास परिषदेचे राष्ट्रीय संघटन मंत्री सुरेश जैन उपस्थित होते. सन्माननीय अतिथी म्हणून ज्येष्ठ चार्टर्ड अकाऊंटंट आर. एन. हरगुडे आणि ख्यात डॉ. रमाकांत नायक उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून भारतमाता, स्वामी विवेकानंद तसेच परिषदेचे संस्थापक डॉ. सुरज प्रकाश यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. अक्षता मोरे यांनी ‘वंदे मातरम’चे भावपूर्ण गायन केले.

भारत विकास परिषदेचे बेळगाव अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषण केले. राष्ट्रीय महिला कार्यकारिणी सदस्या स्वाती घोडेकर यांनी परिषदेच्या सेवाकार्याची माहिती दिली. परिषदेचे दक्षिण भारत विभागीय सेवा सचिव पांडुरंग नायक यांनी नवीन सदस्यांना पदग्रहण शपथ देवविली. संस्थेची मूल्ये व उद्दिष्टे जपण्याचा आणि समाज व राष्ट्राच्या निस्वार्थ सेवेसाठी स्वतःला समर्पित करण्याचा संकल्प नवीन सदस्यांनी केला.
मुख्य अतिथी सुरेश जैन यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात परिषदेची दूरदृष्टी, उद्दिष्टे आणि मार्गदर्शक तत्त्वे यांवर सविस्तर भाष्य केले. निस्वार्थ सेवा, राष्ट्रीय एकता, भारतीय संस्कृतीचे जतन आणि राष्ट्रनिर्मितीप्रती अटळ निष्ठा याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी विशेषतः महिलांना स्वावलंबी होण्यासाठी प्रेरित केले.
स्थापना दिनाचे औचित्य साधून समाजात उत्कृष्ट सेवाकार्याबद्दल ज्येष्ठ चार्टर्ड अकाऊंटंट आर. एन. हरगुडे आणि ख्यात डॉ. रमाकांत नायक यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. डॉ. रमाकांत नायक आणि सीए आर. एन. हरगुडे यांनी संबोधित करताना भारत विकास परिषदेच्या निस्वार्थ राष्ट्र व सेवा कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली व शुभेच्छा दिल्या.
परिषदेच्या महिला सदस्या सुखद देशपांडे, प्रा. अरुणा नाईक, रजनी गुर्जर, जया नायक व स्वाती घोडेकर यांनाही मुख्य अतिथी सुरेश जैन यांच्याहस्ते खास सन्मानित करण्यात आले. या विशेष प्रसंगी भारत विकास परिषदेतर्फे आत्मनिर्भरतेसाठी एका गरजू महिलेला शिलाई मशीन तसेच शालेय शुल्क भरण्यासाठी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यात आली.
प्रा. अरुणा नाईक यांनी कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन केले. प्रा. प्रतिभा हल्लेप्पनवर यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमास भारत विकास परिषदेचे सदस्य तसेच निमंत्रित बहुसंख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *