Monday , September 21 2026
Breaking News

बेळगावच्या पाणीटंचाईसाठी तिलारीचे अतिरिक्त पाणी राकसकोपला वळविण्याची मागणी

Spread the love

 

माजी नगरसेवक संघटनेचे आमदार शिवाजीराव पाटील यांना निवेदन

बेळगाव : शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तिलारी धरणातील अतिरिक्त पाणी मार्कंडेय नदीमार्गे राकसकोप जलाशयात वळविण्याची मागणी बेळगाव महानगरपालिकेच्या माजी नगरसेवक संघटनेने केली आहे. यासंदर्भात संघटनेच्या शिष्टमंडळाने चंदगड मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.

निवेदनात म्हटले आहे की, कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागासह विशेषतः बेळगाव शहराला दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी तिलारी धरणातील अतिरिक्त पाणी मार्कंडेय नदीमार्गे राकसकोप जलाशयात वळविण्याचा प्रस्ताव अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. या विषयावर यापूर्वी अनेक स्तरांवर चर्चा झाली असली, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी दोन्ही राज्यांमध्ये अद्याप ठोस निर्णय झालेला नाही.

तिलारी धरणातून वीजनिर्मितीनंतर उपलब्ध होणारे अतिरिक्त पाणी राकसकोप जलाशयात सोडल्यास बेळगाव शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटू शकतो. तसेच हे पाणी मार्कंडेय नदीतून प्रवाहित झाल्यास नदीला वर्षभर प्रवाह मिळेल. परिणामी नदीकाठच्या परिसरातील भूजल पातळी वाढण्यास मदत होईल, तसेच शेतकऱ्यांच्या सिंचनासाठीही मोठा दिलासा मिळेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्य सरकारांनी संयुक्तपणे सकारात्मक भूमिका घेऊन तातडीने चर्चा सुरू करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे. विशेषतः महाराष्ट्र शासनाने या विषयाला प्राधान्य देत आवश्यक निर्णय प्रक्रिया गतीमान करावी, अशी अपेक्षाही निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे.

बेळगावच्या भविष्यातील पाणीसुरक्षेच्या दृष्टीने तिलारीचे अतिरिक्त पाणी राकसकोप जलाशयात वळविण्याचा प्रस्ताव महत्त्वाचा ठरू शकतो. त्यामुळे दोन्ही राज्य सरकारांनी राजकीय इच्छाशक्ती दाखवत हा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *