

पाचव्या वर्षीही वारकऱ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था
सुळगा (हिं.) : आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे पायी निघालेल्या गोव्यातील उस्ते-सत्तरी, वाळपई येथील श्रीराम माऊली वारकरी मंडळाच्या दिंडीचे बुधवारी सुळगा (हिं.) येथे ग्रामस्थांनी उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत केले. यावेळी वारकऱ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करून, दिवंगत सामाजिक कार्यकर्ते शट्टूप्पा (बाळू) पाटील यांनी सुरू केलेली सेवाभावाची परंपरा त्यांच्या कुटुंबीयांनी यंदाही कायम ठेवली.
बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील हनुमान मंदिर परिसरात आयोजित स्वागत कार्यक्रमासाठी स्व. शट्टूप्पा पाटील यांचे सुपुत्र रोहन पाटील, समाजसेविका माधुरी जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला. दिंडीचे स्वागत करून सर्व वारकऱ्यांना अल्पोपहाराचे वितरण करण्यात आले. पावसाने उघडीप दिल्यामुळे वारकऱ्यांनी मोकळ्या वातावरणात अल्पोपहाराचा आनंद घेतला.
यावेळी वारकरी विद्येश माडकर यांनी श्रीराम माऊली वारकरी मंडळाच्या पायी वारीची माहिती देत सांगितले की, यंदाची ही मंडळाची पाचवी पायी वारी असून उस्ते येथून खांद्यावर पालखी घेऊन पंढरपूरपर्यंत पायी प्रवास करणे हे या दिंडीचे वैशिष्ट्य आहे. यंदाच्या वारीत १५३ वारकरी सहभागी झाले असून दररोज नामस्मरणावर विशेष भर दिला जातो. वारीचे प्रमुख बारकेलो राणे (बुवा), उपप्रमुख सर्वेश राणे, संचालक रामकृष्ण इब्रामपूरकर आणि सचिव मोहन वांतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वारीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सुळगा ग्रामस्थांनी केलेल्या स्वागताबद्दल तसेच रोहन पाटील, माधुरी जाधव आणि सहकाऱ्यांनी केलेल्या सेवाभावी उपक्रमाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
प्रास्ताविकात शेखर मनोहर पाटील यांनी स्व. शट्टूप्पा पाटील यांच्या सामाजिक कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. वारकऱ्यांची सेवा म्हणजेच ईश्वरसेवा या भावनेतून त्यांनी चार वर्षांपूर्वी या दिंडीच्या अल्पोपहाराची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांच्या निधनानंतरही त्यांचा सुपुत्र रोहन पाटील, भगिनी माधुरी जाधव आणि सहकाऱ्यांनी ही सेवा अखंडपणे सुरू ठेवत त्यांच्या कार्याचा वारसा जपला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दिंडीच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छाही दिल्या.
माधुरी जाधव यांनी मनोगतात स्व. शट्टूप्पा पाटील यांनी रुजविलेल्या सेवाभावाच्या संस्कारांना पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा मानून ही परंपरा भविष्यातही अविरत सुरू राहील, असे त्यांनी सांगितले. या उपक्रमासाठी सुळगा ग्रामस्थांसह भरत पाटील, वीर पाटील, राजश्री कदम, मनीषा देसाई आणि अन्य सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दिंडीचा उर्वरित प्रवास निर्विघ्न आणि मंगलमय व्हावा, अशी प्रार्थनाही त्यांनी व्यक्त केली.

श्रीराम सेना हिंदुस्थानचे ग्रामीण अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते भरत पाटील यांनीही दिंडीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत वारकरी परंपरेतील सेवाभावाचे महत्त्व अधोरेखित केले.
दरवर्षीप्रमाणे केलेल्या स्वागत व अल्पोपहार व्यवस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत दिंडीच्या वतीने रोहन पाटील, माधुरी जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी निवृत्त पोलीस उपनिरीक्षक राजश्री कदम, वासंती पाटील, श्वेता खांडेकर, स्मिता पाटील, वीर पाटील, भरत पाटील, साईनाथ पाटील, माजी सैनिक ऑन. कॅप्टन धनाजी मोरे, परशराम सांगावकर, मोन्नापा पाटील, शिवा पुजारी, दिलीप कोंडुसकोप, रमेश कुडचीकर, योगेश कुडचीकर, ओमकार पाटील, भरत कुडचीकर, गोपाळ कलखांबकर, बाबुराव कोकीतकर, प्रथमेश कोचेरी, नागेश निलजकर, शंकर अष्टेकर, पार्थ खांडेकर, रोहित चौगुले, सूरज चौगुले, रमेश कलखांबकर, खेमानी कलखांबकर, धनंजय मोहिते आदी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta