Sunday , September 20 2026
Breaking News

बेळगावात दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या; कौटुंबिक वादातून रक्तरंजित घटना

Spread the love

 

बेळगाव : किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या कौटुंबिक वादाचे पर्यवसान दोन सख्ख्या भावांच्या निर्घृण हत्येत झाल्याची धक्कादायक घटना बेळगाव जिल्ह्यातील यरगट्टी तालुक्यातील नुग्गानट्टी गावात घडली.

मृतांची ओळख लगमप्पा रामण्णवर (वय ३२) आणि बसप्पा रामण्णवर (वय ३८) अशी झाली आहे. दोघेही सख्खे भाऊ असून त्यांच्यावर नातेवाईकांनीच धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

माहितीनुसार, मृतांच्या कुटुंबीयांमध्ये आणि नातेवाईकांमध्ये कौटुंबिक कारणावरून वाद सुरू झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली; मात्र वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी संतप्त झालेल्या सुमारे सहा नातेवाईकांनी धारदार शस्त्रांनी दोन्ही भावांवर हल्ला चढवला. गंभीर जखमी झालेल्या दोघांचा घटनास्थळीच मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच मुरगोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून अंत्यसंस्कार करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बसरगी, मुरगोडचे सीपीआय आय. एम. मठपती आणि पीएसआय एल. बी. माळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

या दुहेरी हत्याप्रकरणी मुरगोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असून, फरार झालेल्या सहा संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *