Monday , September 21 2026
Breaking News

सिद्धरामय्या यांच्याशी कोणतेही मतभेद नाहीत : मंत्री सतीश जारकीहोळी

Spread the love

 

बंगळुरू/बेळगाव : माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी कोणतेही मतभेद नसून आम्ही पूर्वीप्रमाणेच आजही एकत्र काम करत आहोत, असे स्पष्ट करत सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला.
बंगळुरू येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जारकीहोळी म्हणाले की, सिद्धरामय्या आणि त्यांच्या गटात मतभेद असल्याच्या चर्चा निराधार आहेत. “आम्ही गेली तीन दशके एकत्र राजकारण करत आहोत. आमच्यात कोणताही वाद किंवा संभ्रम नाही. काही माध्यमांतून निर्माण करण्यात आलेल्या चर्चांना फारसे महत्त्व देण्याचे कारण नाही,” असे त्यांनी सांगितले.
केपीसीसी अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात बोलताना जारकीहोळी यांनी पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी सर्व नेते एकत्रितपणे काम करतील, असा विश्वास व्यक्त केला. नवीन नेतृत्वाला पक्षाला अधिक मजबूत करण्याची संधी मिळेल आणि त्यासाठी आपण पूर्ण सहकार्य करू, असेही ते म्हणाले.
मंत्रिमंडळ पुनर्रचना आणि विस्ताराबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, या संदर्भातील प्राथमिक चर्चा पूर्ण झाली असून पक्षश्रेष्ठींसमोर विविध मुद्दे मांडण्यात आले आहेत. पुढील टप्प्यातील चर्चेनंतर अंतिम निर्णय काँग्रेस हायकमांड घेणार आहे. पात्र आणि नव्या चेहऱ्यांना संधी दिल्यास पक्ष संघटनेला बळ मिळेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
यावेळी बेळगाव जिल्ह्याच्या प्रतिनिधित्वाचा मुद्दा उपस्थित करत जारकीहोळी म्हणाले की, राज्य मंत्रिमंडळात जिल्ह्याला आणखी एक मंत्रीपद मिळावे, अशी स्थानिक नेत्यांची अपेक्षा आहे. मात्र, यासंदर्भातील अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींकडून घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *