Sunday , September 20 2026
Breaking News

सीमा लढ्याला नवी धार; मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांचा बिदर-भालकी दौरा

Spread the love

 

उदगीर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाच्या लढ्याला नवचैतन्य देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने कंबर कसली असून, समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी दोन दिवसीय बिदर-भालकी दौरा करून सीमाभागातील मराठी जनतेच्या व्यथा प्रत्यक्ष जाणून घेतल्या. या दौऱ्यात त्यांनी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सीमा सैनिकांशी सखोल संवाद साधत आगामी लढ्याची दिशा निश्चित केली.

मरगाळे यांनी बिदर जिल्हा महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष रामराव राठोड यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी सीमा प्रश्नाशी संबंधित त्यांच्या ताब्यातील ऐतिहासिक, कायदेशीर आणि दुर्मिळ दस्तऐवजांचा अभ्यास करून सीमा लढ्याच्या पुढील रणनीतीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

दौऱ्यादरम्यान त्यांनी सीमाभागातील ज्येष्ठ नेते जीवनराव शिंदे, दिवंगत सचिव नवनाथ वासरे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या सीमा चळवळीतील योगदानाला आदरांजली वाहिली. तसेच समितीचे ज्येष्ठ नेते जाधव आणि सीमा लढ्याचे प्रणेते, माजी आमदार स्वर्गीय बापूसाहेब पाटील एकंबेकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कार्याला कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.

यावेळी सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्याय, शैक्षणिक व प्रशासकीय अडचणी, संघटनात्मक बळकटी, न्यायालयीन लढा आणि आगामी आंदोलनाच्या आराखड्यावर व्यापक चर्चा झाली. मराठी भाषिकांच्या न्याय्य हक्कांसाठीचा संघर्ष अधिक तीव्र, संघटित आणि परिणामकारक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

बिदर-भालकी दौऱ्यामुळे सीमा लढ्याला नवी ऊर्जा मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली असून, मराठी अस्मिता आणि सीमावासीयांच्या हक्कांसाठीचा लढा अधिक जोमाने पुढे नेण्याचा स्पष्ट संदेश या दौऱ्यातून देण्यात आला.
दौऱ्यावेळी प्रकाश मरगाळे यांच्यासोबत सुहास हुद्दार, पांडू पट्टण, मारुती मरगाणाचे, सुनील आनंदाचे, सुहास हुद्दार, महादेव मंगणाकर, लक्ष्मण मेणसे, उमेश पाटील, वैभव मरगाणाचे होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *