


उदगीर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरील महाराष्ट्र एकीकरण समितीचा सहा दशकांहून अधिक काळ सुरू असलेला लढा आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, या लढ्यात महाराष्ट्र सरकारची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. सरकारने अलीकडे घेतलेल्या बैठकीत सकारात्मकता दाखविल्याने आशा निर्माण झाली असून, महाराष्ट्राच्या भूमिकेकडे सीमाभागातील मराठी बांधव आशेने पाहत आहेत, असे प्रतिपादन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केले.
येथील छत्रपती राजे शिवाजी महाविद्यालयात शुक्रवारी बिदर जिल्हा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मरगाळे होते. व्यासपीठावर बिदर जिल्हा महाराष्ट्र एकीकरण समितीचे सचिव पृथ्वीराज पाटील एकंबेकर, उपाध्यक्ष भास्करराव कुलकर्णी, किशनराव पाटील इंचूरकर, विठ्ठलराव बागदे, किशनराव पाटील मुर्कीकर आणि राजकुमार पाटील उपस्थित होते.

मरगाळे म्हणाले की, बेळगावसह ८६५ मराठी भाषिक गावे कर्नाटकात गेल्यानंतर तत्कालीन महाराष्ट्र सरकार आणि विरोधी पक्षांनी सीमा लढ्याला ठाम पाठिंबा दिला होता. मात्र, १९८६ नंतर या प्रश्नावरील राजकीय तीव्रता कमी झाली असली तरी महाराष्ट्र एकीकरण समितीचा संघर्ष अखंड सुरू आहे. कर्नाटक सरकारकडून समितीच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
राष्ट्रीय पक्षांकडून समितीच्या कार्यकर्त्यांना विविध आमिषे दाखवून संघटनेत फूट पाडण्याचे प्रयत्न होत असल्याचा दावा करत त्यांनी युवकांनी सीमा लढ्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. सीमा प्रश्नाची तीव्रता आजच्या लोकप्रतिनिधींना समजून सांगण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
बैठकीत किशनराव पाटील यांनी कर्नाटक सरकार मराठी भाषिकांना सापत्न वागणूक देत असल्याची खंत व्यक्त केली. विठ्ठलराव बागदे यांनी संघर्ष हा सीमाभागातील मराठी जनतेच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनल्याचे सांगत वयोवृद्ध कार्यकर्त्यांवरही गुन्हे दाखल होत असल्याची टीका केली.
नारायण पाटील कोरेकलकर यांनी सीमाभागातील मुलींना महाराष्ट्रात मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली. प्रास्ताविकात पृथ्वीराज पाटील यांनी सीमा लढ्यात आता तिसरी पिढी सहभागी असून सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणाबाबत जनजागृती करण्याची गरज असल्याचे सांगितले.
यावेळी दिनेश मुदाळे, सतीश वासरे आणि सिद्धेश्वर लांडगे यांनीही मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, सीमा लढ्याचे प्रणेते माजी आमदार स्वर्गीय बापूसाहेब पाटील एकंबेकर आणि स्वर्गीय दीपक दळवी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. दीपक दळवी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक मिनिट मौन पाळण्यात आले.
कार्यक्रमाला बेळगावसह सीमाभागातील सुहास हुद्दार, पांडू पट्टण, मारुती मरगाणाचे, सुनील आनंदाचे, महादेव मंगणाकर, लक्ष्मण मेणसे, उमेश पाटील, वैभव मरगाणाचे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन शरद खोंडे यांनी, तर आभार प्रा. डी. आर. पाटील यांनी मानले.


Belgaum Varta Belgaum Varta