


भव्य ‘काव्य लेखन कार्यशाळा’ उत्साहात संपन्न; नवोदित कवी व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण
बेळगाव : कार्यशाळेत नवोदित कवी, विद्यार्थी आणि साहित्यप्रेमींना कविता लेखनाचे तंत्र, रचना, आशय, अभिव्यक्ती आणि सर्जनशीलतेचे विविध पैलू यांविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. प्रमुख वक्ते मार्गदर्शक कवी श्री. शिवाजी शिंदे यांचे प्रभावी मार्गदर्शन करताना म्हणाले; ‘कवितेचे अंतरंग’ या विषयावर अत्यंत हृदयस्पर्शी आणि विचारप्रवर्तक मार्गदर्शन केले. “कविता म्हणजे अस्वस्थ मनाचा हुंदका असतो,” असे सांगत त्यांनी कवितेचे भावविश्व उलगडून सांगितले. ते म्हणाले की, निर्जीवाला सजीव करण्याचे अद्भुत सामर्थ्य कवीच्या शब्दांत असते. उत्कट भावना, संवेदनशीलता आणि जीवनानुभव यांच्या मिलाफातूनच खरी कविता जन्माला येते. भावनांची तीव्रता नसल्यास ना उत्कृष्ट कविता निर्माण होते, ना खरा कवी घडतो. समाजप्रबोधन, समाजसंवर्धन आणि मानवतेचे मूल्य जपण्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य कवी करत असतो.
कविता लेखनाची प्रक्रिया समजावून सांगताना त्यांनी तीन महत्त्वाचे टप्पे स्पष्ट केले – पहिला टप्पा: मनात उमटणाऱ्या भावना, विचार आणि अनुभव कोणताही विलंब न लावता कागदावर उतरवणे. दुसरा टप्पा: लिहिलेल्या साहित्याचे वारंवार वाचन करून त्यावर सखोल चिंतन, आत्मपरीक्षण आणि आवश्यक सुधारणा करणे. तिसरा टप्पा: कवितेची रचना, शब्दांची निवड, लय, आशय आणि अभिव्यक्ती यांचा योग्य समतोल साधून प्रत्येक शब्द प्रभावीपणे मांडत कवितेला अंतिम स्वरूप देणे. त्यांच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे उपस्थित नवोदित कवी, विद्यार्थी आणि साहित्यप्रेमींना कविता लेखनाचे तंत्र, भावविश्व आणि सर्जनशीलतेची नवी दिशा मिळाली. “कविता म्हणजे अस्वस्थ मनाचा हुंदका असतो,” असे सांगितले. निर्जीवाला सजीव करण्याची ताकद कवितेत असून समाजप्रबोधन आणि समाजसंवर्धनाचे महत्त्वपूर्ण कार्य कवी करीत असतो असे प्रतिपादन कवी शिवाजी शिंदे यांनी केले.
विश्वभारत सेवा समिती, बेळगाव, राज्य मराठी विकास संस्था मुंबई, मंथन मराठी साहित्य संघ, विश्वभारत जनकल्याण सामाजिक संस्था, बेळगाव, अखिल भारतीय प्रगतिशील एल्गार सामाजिक साहित्य परिषद बहुउद्देशीय संस्था, बेळगाव तसेच संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली ‘काव्य लेखन कार्यशाळा’ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि भरघोस प्रतिसादात संपन्न झाली. पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालय शहापूर, बेळगाव येथील श्री पुंडलिकराव बाळाराम कंग्राराळकर वाचनालच्या सभागृहात ही कार्यशाळा आणि निबंध स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते देवकुमार बिर्जे हे होते.
व्यासपीठावर विश्वभरत सेवा समितीचे सचिव प्रकाश नंदीहळली, प्रमुख वक्ते कवी शिवाजी शिंदे, कवी गुणवंत पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून कुस्ती कोच निवृत्ती अधिकारी विलास घाडी, ज्येष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते देवकुमार बिरजे, प्रा. मयूर नागेहट्टी व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण प्रास्ताविक विश्वभारत सेवा समितीचे सचिव प्रकाश नंदिहळी यांनी केले.
आपल्या प्रास्ताविकात त्यांनी मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी अशा साहित्यिक उपक्रमांची आजच्या काळात अत्यंत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. तसेच या संयुक्त कार्यशाळेच्या आयोजनामागील उद्दिष्ट स्पष्ट केले.
कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक कवी श्री. गुणवंत पाटील यांनी ‘कविता कशी असावी’ या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी कविता ही केवळ शब्दांची मांडणी नसून जीवनातील अनुभव, संवेदना आणि भावविश्वाची सर्जनशील अभिव्यक्ती असल्याचे सांगितले.
ते म्हणाले, “आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटना, समाजातील बदल, निसर्गातील विविधता आणि जीवनातील अनुभव यांचे संवेदनशीलपणे निरीक्षण करून त्याचे शब्दरूप देणे म्हणजे कविता होय. कविता लिहिण्यासाठी विविध भाव, रस आणि अभिव्यक्तीचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. मेंदूतील विचार आणि हृदयातील भावना यांचा सुंदर मिलाफ ज्या क्षणी शब्दांत उतरतो, त्याच क्षणी खरी कविता जन्म घेते. कविता ही माणसाच्या अस्वस्थ मनाला शांत करणारे औषध असून, जीवनाला नवी ऊर्जा आणि सकारात्मक दिशा देण्याचे सामर्थ्य तिच्यात आहे.”
त्यांच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे उपस्थित नवोदित कवी, विद्यार्थी आणि साहित्यप्रेमींना कविता लेखनाची नवी दृष्टी मिळाली. त्यांच्या विचारांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद देत कार्यशाळेला मोठा प्रतिसाद दिला.
यानंतर कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर व पाहुण्यांचा परिचय सौ. अर्चना नांद्रे यांनी करून दिला.
निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. विलास घाडी यांनी आपल्या मनोगतात आयोजकांनी हाती घेतलेल्या या साहित्यिक उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करून विजेत्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
विजेते पुढीलप्रमाणे
प्रथम क्रमांक: धनश्री मारुती बाचीकर (जिजामाता हायस्कूल, बेळगाव), द्वितीय क्रमांक: प्रगती अनिल कित्तुरकर (बालिका आदर्श विद्यालय, बेळगाव), तृतीय क्रमांक: सुवर्णा सुहास मोदगेकर (रणझुंजार हायस्कूल, निलजी)
उत्तेजनार्थ पुरस्कार
भाग्यश्री आप्पया मोदगेकर (रणझुंजार हायस्कूल, निलजी)
हर्ष गावडू पाटील (मराठी विद्या निकेतन, बेळगाव)
अध्यक्षीय समारोप
अध्यक्षीय समारोप करताना देवकुमार बिर्जे यांनी विद्यार्थ्यांच्या साहित्यप्रेमाचे कौतुक केले. नवोदित कवींनी सातत्याने वाचन, चिंतन आणि लेखनाची सवय जोपासून समाजाभिमुख साहित्यनिर्मिती करावी, असे आवाहन त्यांनी केले. सर्व सहभागी विद्यार्थी व विजेत्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ही कार्यशाळा नवोदित कवींना प्रेरणा देणारी, साहित्याची गोडी निर्माण करणारी आणि मराठी भाषा व साहित्य संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला निळू भाऊ नार्वेकर, मधू पाटील, प्रा. निलेश शिंदे, किरण पाटील, वाय. बी. पवार, वेदिका खन्नूकर, रोशनी हुंद्रे, प्रा.मनिषा नाडगौडा, प्रा. स्मिता मुतगेकर यांच्यासह अनेक साहित्यप्रेमी, नवोदित कवी, विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री. मयूर नागेनहट्टी यांनी केले, तर सौ. रेणुका चलवेटकर यांनी आभार मानले. याप्रसंगी विविध संस्थांचे पदाधिकारी सदस्य कर्मचारी संचालक मंडळ विद्यार्थी पालक शिक्षक प्राध्यापक कर्मचारी आणि कवी रसिक हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Belgaum Varta Belgaum Varta