Sunday , July 26 2026
Breaking News

साठे मराठी प्रबोधिनीतर्फे व्यक्तिमत्त्व विकास शिबिर संपन्न

Spread the love

 

बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई आणि गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी विद्यानिकेतन, बेळगाव येथे आयोजित करण्यात आलेले व्यक्तिमत्त्व विकास शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे, आत्मविश्वास वाढविणे, नेतृत्वगुण विकसित करणे आणि आधुनिक युगातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. शिबिरात एकूण ९५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या शिबिराचे प्रमुख पाहुणे म्हणून एरोनॉटिकल इंजिनिअरिंग क्षेत्रातील गोल्ड मेडलिस्ट श्री. सर्वेश पाटील उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना यशासाठी कठोर परिश्रम, सातत्य, वेळेचे व्यवस्थापन, सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास या गुणांचे महत्त्व विशद केले. शिक्षणासोबतच कौशल्यविकास, नव्या तंत्रज्ञानाचे ज्ञान, इंग्रजीसह विविध भाषांवरील प्रभुत्व आणि संशोधनाची वृत्ती विकसित करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
आपल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रवासातील अनुभव सांगताना श्री. सर्वेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचे, अपयशाला न घाबरता त्यातून शिकण्याचे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावर यश संपादन करण्याचे आवाहन केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक श्री. बी. बी. शिंदे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी व्यक्तिमत्त्व विकासासाठी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच चारित्र्य, शिस्त, सामाजिक बांधिलकी, प्रभावी संवादकौशल्य आणि संस्कार यांचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी ज्ञान, कौशल्य आणि मूल्यांचा समतोल साधत स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवावे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. इंद्रजीत मोरे यांनी प्रास्ताविक करताना शाळेत स्थापन केलेल्या बुद्ध ते आंबेडकर समविचारी अध्यासन केंद्राचा उद्देश व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा शिबिरांची आवश्यकता याविषयी माहिती दिली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
शिबिरात व्यक्तिमत्त्व विकास, प्रभावी संवादकौशल्य, नेतृत्वगुण, वेळेचे व्यवस्थापन, करिअर नियोजन, स्पर्धा परीक्षांची तयारी, सकारात्मक विचारसरणी, संघभावना आणि ध्येयपूर्ती यांसारख्या विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधत शिबिराचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. इंद्रजीत मोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. नारायण उडकेकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला श्री. बी. जी. पाटील, सविता पवार, शांताराम पाटील, प्रसाद सावंत, गजानन सावंत, यलाप्पा पाटील उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *