Sunday , July 26 2026
Breaking News

एसआयआर फॉर्म मराठीत उपलब्ध करून द्या; खासदार अरविंद सावंत यांची मुख्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी

Spread the love

 

बेळगाव : कर्नाटकातील बेळगावसह मराठी भाषिक अल्पसंख्याक भागांतील मतदारांसाठी विशेष सघन मतदार यादी पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेचे अर्ज मराठी भाषेत उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात सावंत यांनी नमूद केले आहे की, मतदार याद्या अचूक व सर्वसमावेशक ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने सुरू केलेली एसआयआर प्रक्रिया स्वागतार्ह असली, तरी बेळगाव जिल्हा आणि सीमाभागातील हजारो मराठी भाषिक मतदारांना एसआयआरचे अर्ज केवळ कन्नड भाषेत उपलब्ध होत असल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.या भागातील अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला आणि ग्रामीण भागातील मतदारांना कन्नड भाषेचे पुरेसे ज्ञान नसल्यामुळे अर्ज समजून घेणे आणि अचूकपणे भरणे कठीण जात आहे. त्यामुळे अनेकांना इतरांची मदत घ्यावी लागत असून अर्जातील चुका, अपूर्ण माहिती किंवा चुकीच्या नोंदी होण्याची शक्यता वाढत आहे. परिणामी पात्र मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

सावंत यांनी १९९५ मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाने मराठी भाषिक अल्पसंख्याकांच्या भाषिक हक्कांच्या संरक्षणावर भर दिल्याचा उल्लेख केला असून सार्वजनिक सेवांमध्ये आवश्यक भाषिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या भूमिकेची आठवण करून दिली आहे. त्यामुळे एसआयआरचे अर्ज मराठीत उपलब्ध नसणे हे त्या निर्णयाच्या भावनेशी विसंगत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

तसेच भारतीय राज्यघटनेतील कलम १४, १९, २१, २९ आणि ३५० नुसार भाषिक अल्पसंख्याकांचे हक्क संरक्षित असल्याचे सांगत निवडणूक प्रक्रिया सर्वसमावेशक, सुलभ आणि भेदभावमुक्त असावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

खासदार अरविंद सावंत यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे बेळगाव व इतर मराठी भाषिक भागांमध्ये एसआयआरचे अर्ज मराठीत उपलब्ध करून देणे, मराठीत भरलेले अर्ज स्वीकारणे, कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देणे तसेच एसआयआर प्रक्रियेदरम्यान मराठी भाषेत मतदार सहाय्य उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

मराठीत एसआयआर अर्ज उपलब्ध झाल्यास मराठी भाषिक मतदारांच्या अडचणी दूर होतील, मतदान प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढेल आणि निवडणूक प्रक्रियेवरील लोकांचा विश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *