Sunday , September 20 2026
Breaking News

सावंतवाडी–चंदगड रेल्वे मार्गासाठी पुन्हा आवाज; ५० वर्षांनंतरही प्रकल्प रखडलेलाच

Spread the love

 

बेळगाव : सावंतवाडी–चंदगड तसेच महाराष्ट्रातील सीमाभागातील गावांना रेल्वेने जोडण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. १९७० साली या मार्गासाठी सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानंतर २०१८ मध्येही नव्याने सर्वेक्षण झाले, मात्र अद्याप या भागातील नागरिकांना रेल्वे सेवेसाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे.

समता सहकारी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्हा रहिवासी प्रवासी संघाचे अध्यक्ष ॲड. चंद्रकांत निकम यांनी या प्रलंबित रेल्वे प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. त्यांनी सांगितले की, सीमाभागातील शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार आणि पर्यटकांसाठी हा रेल्वे मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक दशकांपासून मागणी करूनही हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरलेला नाही, ही दुर्दैवाची बाब आहे.

ॲड. निकम यांनी पत्रकार आणि लोकप्रतिनिधींनी या प्रश्नासाठी ठोस भूमिका घेण्याची गरज व्यक्त केली. जनतेच्या समस्या शासनापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी माध्यमांची असून, या महत्त्वाच्या पायाभूत सुविधेच्या प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.

“एका बाजूला देशात हायड्रोजन ट्रेन, बुलेट ट्रेन आणि वंदे भारतसारखे आधुनिक रेल्वे प्रकल्प सुरू होत आहेत. मात्र दुसरीकडे सीमाभागातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची साधी रेल्वेची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. विकासाचा लाभ सर्व भागांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे,” असे मत ॲड. चंद्रकांत निकम यांनी व्यक्त केले.

सावंतवाडी–चंदगड रेल्वे मार्ग सुरू झाल्यास कोकण, चंदगड, बेळगाव आणि सीमाभागातील गावांमधील दळणवळण सुलभ होणार असून व्यापार आणि पर्यटनालाही मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.

या प्रकल्पाला मंजुरी देऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी ॲड. चंद्रकांत निकम यांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *