Monday , September 21 2026
Breaking News

रिमझिम सरींच्या भरवशावर भात रोपलागवड; पावसाच्या लपंडावात बळीराजाची जीवाची कसरत

Spread the love

 

बेळगाव : मान्सूनच्या लहरीपणामुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाने दिलास्याचा हात दिला आहे. कडक उन्हामुळे करपण्याच्या मार्गावर असलेल्या पिकांना या सरींनी नवसंजीवनी मिळाली असली, तरीही पुरेसा पाऊस नसल्याने शेतकरी अजूनही चिंतेत आहेत. पावसाच्या भरवशावर आणि वेळ हातातून निसटू नये म्हणून शेतकरी जीवाची कसरत करत भात रोपलागवडीची कामे उरकत आहेत.

यंदा मान्सूनने सुरुवातीपासूनच दडी मारल्याने भात लागवडीचे नियोजन पूर्णपणे विस्कळीत झाले. मागील पंधरवडाभर पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतात लागवडीसाठी आवश्यक पाणीसाठा झाला नाही. त्यामुळे रोपे तयार असूनही अनेक शेतकऱ्यांना लागवड लांबणीवर टाकावी लागली. आता सुरू झालेल्या रिमझिम सरींनी आशेचा किरण दाखविल्याने शेतकऱ्यांनी शिवाराकडे धाव घेतली आहे.

मात्र, बहुतांश शेतांमध्ये अजूनही लागवडीसाठी आवश्यक तेवढे पाणी साचलेले नाही. त्यामुळे विहिरी आणि कूपनलिकांमधील पाणी मोटार व पाइपद्वारे शेतात सोडून कृत्रिम पाणीसाठा केला जात आहे. त्यानंतर ट्रॅक्टरच्या साहाय्याने मशागत करून भात रोपलागवडीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. अतिरिक्त खर्चाचा बोजा सहन करत केवळ हंगाम वाचविण्यासाठी बळीराजा धडपड करत आहे.

पावसाचा लपंडाव शेतीला फटका देत असला, तरी तालुक्यासह शहरालगतच्या शेतवस्ती भागात भात रोपलागवडीची लगबग वाढली आहे. आता सर्वांचे लक्ष आगामी पावसाकडे लागले असून, येत्या काही दिवसांत जोरदार पाऊस झाला तरच खरीप हंगामाला खऱ्या अर्थाने बळ मिळणार आहे. अन्यथा पावसाची अनिश्चितता आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे बळीराजा पुढील संकट आणखी गडद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *