Sunday , September 20 2026
Breaking News

पाच वर्षांनंतर पुन्हा ई-केवायसी; बेळगाव जिल्ह्यात 22.44 लाख रेशनकार्डधारकांची पडताळणी

Spread the love

 

बेळगाव : अपात्र बीपीएल रेशनकार्डधारकांचा शोध घेण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने पुन्हा एकदा ई-केवायसी (e-KYC) मोहीम सुरू केली आहे. पाच वर्षांपूर्वी ई-केवायसी केलेल्या लाभार्थ्यांची नव्याने पडताळणी करण्याचे आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या आयुक्तांनी राज्यातील सर्व उपसंचालकांना दिले आहेत. त्यानुसार बेळगाव जिल्ह्यातील 22 लाख 44 हजार 860 रेशनकार्डधारकांची ई-केवायसी करण्यात येणार आहे.

राज्यासह बेळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अपात्र व्यक्तींनी बीपीएल रेशनकार्ड मिळवल्याची माहिती शासनाच्या निदर्शनास आली होती. यापूर्वी अशा लाभार्थ्यांची छाननी करून अनेक बीपीएल रेशनकार्डांचे एपीएलमध्ये रूपांतर करण्यात आले. यासाठी विविध निकष लागू करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही अनेक अपात्र व्यक्ती बीपीएल योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती विभागाला मिळाल्याने नव्याने पडताळणीची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.

अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या नियमानुसार दर पाच वर्षांनी रेशनकार्डधारकांची ई-केवायसी केली जाते. ज्या लाभार्थ्यांच्या ई-केवायसीला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यांची पुन्हा पडताळणी केली जात आहे. विभागाच्या नोंदीनुसार बेळगाव जिल्ह्यातील 22.44 लाखांहून अधिक लाभार्थ्यांची ई-केवायसी करणे आवश्यक आहे.

संबंधित लाभार्थ्यांची मागील ई-केवायसी 10 जुलै 2026 रोजी पाच वर्षांची झाल्याने जिल्ह्यातील रास्तभाव दुकानदारांकडून ही मोहीम राबविण्यात येत आहे. ई-केवायसीसोबतच रेशन वितरणासाठी आवश्यक असलेली बायोमेट्रिक पडताळणीही केली जात असल्याने रास्तभाव दुकानदारांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढल्याचे चित्र आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *