Saturday , August 8 2026
Breaking News

रोपलावणीसाठी कुटुंब शेतात; घरात एकट्या वृद्धेच्या गळ्यावर चाकू, भरदिवसा लाखोंची लूट

Spread the love

सोनोलीत धाडसी चोरी; ८ तोळे सोने, २० तोळे चांदी व ५० हजारांची रोकड लंपास, ग्रामीण भागात दहशत

बेळगाव : भात रोपलावणीच्या हंगामात घरे ओस पडत असल्याची अचूक रेकी करून चोरट्यांनी भरदिवसा थरारक लूट केली. बेळगावजवळील सोनोली गावात एकट्या असलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यावर चाकू ठेवून तिला जीवे मारण्याची धमकी देत ८ तोळे सोन्याचे दागिने, २० तोळे चांदी आणि ५० हजार रुपयांची रोकड असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. या धाडसी घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोमवारी (२० जुलै) दुपारच्या सुमारास घरातील सर्व सदस्य भात रोपलावणीच्या कामासाठी शेतात गेले होते. घरात केवळ वृद्ध महिला एकटी असल्याची खात्री करून दोन अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील बाजूने प्रवेश केला. घरात शिरताच त्यांनी वृद्ध महिलेच्या गळ्यावर चाकू ठेवून जीवे मारण्याची धमकी दिली आणि कपाट उघडण्यास भाग पाडले.

महिला भयभीत झाल्याचा फायदा घेत चोरट्यांनी कपाटातील सर्व मौल्यवान ऐवजावर हात साफ केला. काही मिनिटांतच लाखोंचा ऐवज घेऊन दोघेही पसार झाले. घटना इतक्या वेगाने घडली की परिसरातील कोणालाही याची चाहूल लागली नाही.

घटनेची माहिती मिळताच वडगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि संशयितांच्या हालचालींची माहिती गोळा करण्यात येत असून आरोपींचा कसून शोध सुरू आहे.

दरम्यान, शेतीच्या हंगामात दिवसा बहुतांश घरे रिकामी राहत असल्याने चोरट्यांनी ग्रामीण भागाला लक्ष्य केल्याची चर्चा सुरू झाली आहे. भरदिवसा घडलेल्या या धाडसी घटनेनंतर सोनोलीसह परिसरातील ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण असून ग्रामीण भागात तातडीने पोलीस गस्त वाढवावी, अशी जोरदार मागणी होत आहे. पोलिसांनी चोरीस गेलेल्या ऐवजाचा तपशील प्राथमिक असल्याचे सांगितले असून तपासानंतर अधिक माहिती स्पष्ट होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

दहशत निर्माण करून फरार झालेल्या रौडीशीटरला अटक; न्यायालयीन कोठडीत रवानगी

Spread the love  बेळगाव : सर्वसामान्य नागरिकांना धमकावणे, दहशत निर्माण करणे आणि दबाव टाकून फरार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *