

कोल्हापूर : महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि मध्य प्रदेशसह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुरू बाळूमामा देवस्थानाच्या आर्थिक व्यवहारांतील ६० कोटी ७५ लाख २८ हजार ६० रुपयांच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी भुदरगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात तत्कालीन निरीक्षक तथा कार्याध्यक्ष रागिणी झुंजारराव खडके, सचिव रावसाहेब कोणकेरी तसेच संबंधित विश्वस्त, कंत्राटदार, व्यापारी आणि इतर संबंधित व्यक्तींविरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांत दाखल झालेल्या तक्रारीनुसार, मार्च २०२० ते मार्च २०२६ या कालावधीत देवस्थानाच्या आर्थिक व्यवहारांमध्ये संगनमत करून निधीचा कथित अपहार करण्यात आला. यासाठी बनावट कागदपत्रे तयार करणे, विश्वासघात, फसवणूक तसेच पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
तपास यंत्रणेनुसार, आरोपींविरुद्ध फसवणूक, विश्वासघात, बनावट कागदपत्रे तयार करणे व त्यांचा वापर करणे तसेच कट रचल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कथित गैरव्यवहाराची एकूण रक्कम ६० कोटी ७५ लाख २८ हजार ६० रुपये इतकी असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास भुदरगड पोलीस करत आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta