Saturday , August 8 2026
Breaking News

गुगलवर डॉक्टरांचा नंबर शोधणे महागात! बनावट ‘अपॉइंटमेंट’च्या जाळ्यात अडकून उद्योजकाला ९८ हजारांचा गंडा

Spread the love

 

बेळगाव : डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळवण्यासाठी गुगलवर शोधलेला मोबाईल क्रमांक एका उद्योजकाला तब्बल ९८ हजार रुपयांचा आर्थिक फटका देऊन गेला. बनावट हॉस्पिटल अपॉइंटमेंटच्या नावाखाली APK फाईल पाठवत सायबर गुन्हेगारांनी बँक खातेच साफ केल्याची धक्कादायक घटना हनुमान नगर परिसरात घडली असून, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हनुमान नगर येथील एका उद्योजकाला आपल्या आईला डॉक्टरांकडे घेऊन जायचे असल्याने अपॉइंटमेंटची गरज होती. डॉक्टरांचा अधिकृत संपर्क क्रमांक मिळत नसल्याने त्यांनी गुगलवर शोध घेतला. शोधादरम्यान ‘हॉस्पिटल अपॉइंटमेंट’ या नावाने दिसलेल्या मोबाईल क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला. समोरील व्यक्तीने स्वतःला हॉस्पिटलचा प्रतिनिधी असल्याचे भासवत ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक करण्याचा सल्ला दिला.

यानंतर संबंधित व्यक्तीने ‘हॉस्पिटल अपॉइंटमेंट बुकिंग’ नावाची APK फाईल पाठवली. ती आयफोनमध्ये उघडत नसल्याचे सांगितल्यावर, “अँड्रॉइड फोनवरून फाईल उघडा,” असा सल्ला देण्यात आला. विश्वास ठेवून उद्योजकाने पत्नीच्या अँड्रॉइड मोबाईलवर ती फाईल डाउनलोड करून उघडली.

काही क्षणांतच “अपॉइंटमेंट निश्चित झाली,” असे सांगत सायबर गुन्हेगारांनी फोन कट केला. मात्र, त्यानंतर लगेचच उद्योजकाच्या पत्नीच्या बँक खात्यातून ९८ हजार रुपये परस्पर वळते झाल्याचा संदेश मोबाईलवर येताच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. APK फाईलच्या माध्यमातून मोबाईलवरील बँकिंग माहिती हॅक करून ही रक्कम लंपास केल्याचे उघड झाले.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित उद्योजकाने सायबर क्राईम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला असून, या सायबर रॅकेटमागील टोळीचा तपास सुरू आहे.

सावधान!

सायबर पोलिसांनी नागरिकांना गुगलवर मिळालेल्या अनोळखी मोबाईल क्रमांकांवर विश्वास न ठेवण्याचे, कोणतीही APK फाईल डाउनलोड किंवा इन्स्टॉल न करण्याचे तसेच डॉक्टर किंवा हॉस्पिटलचा संपर्क क्रमांक केवळ अधिकृत संकेतस्थळ अथवा विश्वासार्ह स्रोतांवरूनच घेण्याचे आवाहन केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

दहशत निर्माण करून फरार झालेल्या रौडीशीटरला अटक; न्यायालयीन कोठडीत रवानगी

Spread the love  बेळगाव : सर्वसामान्य नागरिकांना धमकावणे, दहशत निर्माण करणे आणि दबाव टाकून फरार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *