Sunday , July 26 2026
Breaking News

माळअंकले व झाडअंकले गावांना अखेर बससेवेची जोडणी

Spread the love

 

सूर्यकांत कुलकर्णी यांच्या हस्ते बससेवेला प्रारंभ; ग्रामस्थांमध्ये उत्साह

खानापूर : खानापूर तालुक्यातील माळअंकले व झाडअंकले या गावांना दीर्घकाळापासून प्रतीक्षेत असलेल्या बससेवेला अखेर सुरुवात झाली. खानापूर तालुका गॅरंटी योजना समितीचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांच्या हस्ते बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. गावात पहिल्यांदाच बससेवा सुरू झाल्याने ग्रामस्थ, महिला व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी गॅरंटी योजना समितीचे सदस्य रुद्राप्पा पाटील, बसचालक एम. वाय. पाटील व वाहक आर. डी. पाटील यांचा गावातील पंचमंडळी व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना सूर्यकांत कुलकर्णी म्हणाले की, माळअंकले गावासाठी बससेवा सुरू व्हावी, यासाठी आपण व गॅरंटी योजना समितीचे सदस्य रुद्राप्पा पाटील यांनी सातत्याने प्रयत्न केले. मासिक बैठकीत हा प्रश्न वेळोवेळी मांडण्यात आला. त्यानंतर गावाला बससेवा मिळाली असून, यापुढेही ती कायमस्वरूपी सुरू राहण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

इदलहोंड ते माळअंकले या मार्गावर रस्त्याच्या कडेला वाढलेली झाडे-झुडपे बसच्या वाहतुकीस अडथळा ठरू नयेत, यासाठी ग्रामस्थांनी श्रमदानातून रस्ता स्वच्छ ठेवावा, अशी विनंतीही त्यांनी केली.

बस गावात दाखल होताच ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. यावेळी महिला मंडळ, पंचमंडळी, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला रुद्राप्पा पाटील, शिवाजी होसुरकर, मारुती नीडगलकर, यल्लाप्पा होसुरकर, रेखा होसुरकर, मोनाप्पा गुरव, सदानंद होसुरकर, सुनील चोपडे, पांडुरंग नीडगलकर, निकिता गावडे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका उडकेकर मॅडम, शिक्षिका रेणुका पाटील, एस. के. पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

ई-केवायसीसाठी एक रुपयाही देऊ नका; खानापूर तालुका गॅरंटी योजना अध्यक्षांचे आवाहन

Spread the love  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका पंचहमी गॅरंटी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *