

‘बेडा ब्रो’ अभियानातून अमली पदार्थांविरोधात जनजागृती
बेळगाव : अमली पदार्थांपासून दूर राहून युवकांनी निरोगी व व्यसनमुक्त जीवन जगावे आणि आपल्या कुटुंबासह देशाच्या रक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले.
बेळगाव शहरातील संगोळी रायण्णा प्रथम श्रेणी पदवी महाविद्यालयात मंगळवारी पोलिस विभागाच्या वतीने अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्यासाठी आयोजित ‘बेडा ब्रो’ अभियानाचे उद्घाटन मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
अमली पदार्थांच्या विळख्यात अडकून देशातील युवकांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे. अमली पदार्थांची तस्करी व विक्री रोखणे हे सरकारसमोरील मोठे आव्हान आहे. युवक हे देशाची खरी संपत्ती असून त्यांनी कोणत्याही परिस्थितीत व्यसनांच्या आहारी जाऊ नये. दृढनिश्चय आणि इच्छाशक्तीच्या बळावर व्यसनांवर मात करता येते, असे जारकीहोळी यांनी सांगितले.
युवकांनी आपली ऊर्जा सकारात्मक उपक्रमांमध्ये वापरून शिक्षण, शिस्त आणि चांगले संस्कार आत्मसात करावेत. क्षणिक आकर्षणाला बळी न पडता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे. अमली पदार्थांचे निर्मूलन करण्यासाठी पोलिस विभाग, शैक्षणिक संस्था, पालक आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आमदार राजू (आसिफ) सेठ यांनी युवकांनी यशस्वी जीवन घडविण्यासाठी कठोर परिश्रम करण्याचे आवाहन केले. उच्च शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांपासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. व्यसनामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाल्याची उदाहरणे समाजात पाहायला मिळतात, असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी अमली पदार्थांचे सेवन प्रतिष्ठेचे लक्षण समजणे चुकीचे असल्याचे सांगत, युवकांनी या व्यसनाविरोधात ठामपणे लढा देण्याचे आवाहन केले.
पोलिस आयुक्त भूषण भोरसे यांनी सांगितले की, १ जुलैपासून राज्यात ड्रग्जमुक्त अभियानाला सुरुवात झाली असून, त्याचाच एक भाग म्हणून बेळगाव जिल्ह्यातही व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक महाविद्यालयांमध्ये अमली पदार्थांविरोधात जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. गतवर्षी अमली पदार्थांशी संबंधित ४९ गुन्हे दाखल करून सुमारे ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. अमली पदार्थांची विक्री किंवा सेवनाबाबत माहिती मिळाल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांना कळवावे, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा पोलिस अधीक्षक के. रामराजन यांनी युवकांना अमली पदार्थांच्या विळख्यात अडकविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा इशारा देत, व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी प्रत्येकाने जबाबदारीने पुढे येण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी रोहित सिंह, राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. त्यागराज, कुलसचिव संतोष कामगौडा यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी, महाविद्यालयीन प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ‘बेडा ब्रो’ आणि ‘राईज’ अभियानावरील माहितीपटांचे प्रदर्शन करण्यात आले.

Belgaum Varta Belgaum Varta