Monday , September 21 2026
Breaking News

राकसकोपमध्ये पुन्हा जलसंचयाला वेग; पावसाच्या पुनरागमनाने शहरासह बळीराजाला दिलासा

Spread the love

 

बेळगाव : जुलैच्या उत्तरार्धात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावताच बेळगाव शहराची जीवनवाहिनी असलेल्या राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. पाणलोट क्षेत्रासह शहर आणि तालुक्यात अधूनमधून कोसळणाऱ्या पावसामुळे जलाशयातील जलसाठा वाढत असून शहराच्या पाणीपुरवठ्याबाबतची चिंता काही प्रमाणात दूर झाली आहे. दुसरीकडे, पावसामुळे कोमेजलेल्या खरीप पिकांनाही नवसंजीवनी मिळाल्याने बळीराजाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

सध्या राकसकोप जलाशयाची पाणीपातळी 2,464.70 फूट इतकी नोंदविण्यात आली असून जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अद्याप 10.80 फूट पाण्याची आवश्यकता आहे. मंगळवारी दिवसभर झालेल्या पावसामुळे जलाशयातील पाणीसाठ्यात आणखी वाढ झाली असून आगामी काही दिवस पाऊस कायम राहिल्यास जलाशयाच्या भरावाला अधिक गती मिळण्याची शक्यता आहे.

यंदा जुलै महिन्याचा बहुतांश कालावधी पावसाविना गेल्याने राकसकोप जलाशयाची पाणीपातळी चिंताजनकरीत्या घसरली होती. त्यामुळे शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठ्याबाबत चिंता व्यक्त होत होती. मात्र महिन्याच्या सुरुवातीला सलग आठ दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे जलाशयातील पाणी झपाट्याने वाढले आणि काहीसा दिलासा मिळाला. त्यानंतर पुन्हा दहा-बारा दिवस पावसाने पाठ फिरवल्याने जलसाठ्याची वाढ थांबली होती. आता मागील दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने जलाशयासह शेती क्षेत्रालाही दिलासा मिळाला आहे.

गतवर्षी 20 जुलै रोजी राकसकोप जलाशयाची पाणीपातळी 2,474.20 फूट होती. यंदा ती 2,464.70 फूट इतकी असून गेल्या वर्षी 24 जुलै रोजी जलाशय पूर्ण क्षमतेने भरला होता. यंदा मात्र जलाशय तुडुंब भरण्यासाठी अजून 10.80 फूट पाण्याची गरज आहे. जुलैच्या अखेरच्या आठवड्यात आणि ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस झाल्यास राकसकोप पुन्हा ओसंडून वाहण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, जुलै महिना संपत आला तरी अनेक भागांत भात रोपलागवडीची कामे अद्याप सुरूच आहेत. पावसाची अनिश्चितता कायम असल्याने शेतकरी विहिरी व बोअरवेलमधील पाणी विद्युत पंपांच्या साहाय्याने शेतात सोडून रोपलागवड करत आहेत. नैसर्गिक पावसाची साथ मिळाल्यास खरीप हंगामाला नवसंजीवनी मिळणार असून उत्पादनातही वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *