Sunday , September 20 2026
Breaking News

आषाढीसाठी वारकऱ्यांना दिलासा! बेळगावमार्गे पंढरपूर विशेष रेल्वे; सहा फेऱ्यांचे नियोजन

Spread the love

 

बेळगाव : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी नैऋत्य रेल्वेने मोठा दिलासा दिला आहे. धारवाड–पंढरपूर–धारवाड या मार्गावर 23 ते 28 जुलै दरम्यान विशेष रेल्वे धावणार असून, बेळगावसह सीमाभागातील हजारो भाविकांचा विठुरायाच्या दर्शनाचा प्रवास यामुळे अधिक सुलभ होणार आहे.

दरवर्षी बेळगाव, खानापूर, हुबळी, धारवाड आणि परिसरातील हजारो वारकरी आषाढी एकादशीसाठी पंढरपूरकडे रवाना होतात. मात्र बेळगावहून पंढरपूरसाठी थेट रेल्वे सेवा नसल्याने भाविकांना बदल्या करत प्रवास करावा लागत होता. त्यामुळे विशेष रेल्वे सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. अखेर नैऋत्य रेल्वेने या मागणीची दखल घेत सहा विशेष फेऱ्यांचे नियोजन केले आहे.

या विशेष रेल्वेत एकूण दहा डबे असतील. त्यापैकी आठ जनरल आणि दोन स्लीपर डबे ठेवण्यात आले आहेत. रेल्वे सकाळी 6 वाजता धारवाड येथून सुटून सकाळी 7.49 वाजता खानापूर, 8.30 वाजता बेळगाव, 9.30 वाजता घटप्रभा, दुपारी 12.20 वाजता मिरज येथे पोहोचेल. त्यानंतर सायंकाळी 4.50 वाजता पंढरपूर येथे आगमन होईल.

परतीच्या प्रवासात ही रेल्वे सायंकाळी 6.40 वाजता पंढरपूरहून सुटून मध्यरात्री 1.20 वाजता बेळगाव येथे, तर पहाटे 4.30 वाजता धारवाड येथे पोहोचणार आहे.

धारवाड, लोंढा, खानापूर, देसूर, बेळगाव, पाचापूर, गोकाक, घटप्रभा, चिकोडी रोड, रायबाग, कुडची, उगार, शेडबाळ, विजयपूर, मिरज, अरग, सांगोला आणि पंढरपूर या स्थानकांवर या विशेष रेल्वेला थांबा देण्यात आला आहे.

विशेष रेल्वेच्या निर्णयामुळे बेळगावसह सीमाभागातील वारकऱ्यांची मोठी गैरसोय दूर होणार असून, आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *