Sunday , September 20 2026
Breaking News

“वाचन केले तरच वाचाल” : विद्यार्थिनींना प्रा. मायाप्पा पाटील यांचा प्रेरणादायी संदेश

Spread the love

 

जायंट्स सखीच्या वतीने व्याख्यान

बेळगाव : सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी पुस्तक वाचन अत्यावश्यक असून, वाचनामुळे जीवन अधिक समृद्ध आणि सकस बनते. अनेक अशक्यप्राय गोष्टीही सातत्यपूर्ण वाचनामुळे सहज साध्य होतात. उदात्त ध्येये गाठायची असतील तर चांगल्या पुस्तकांशी मैत्री करावी लागते. उत्तम पुस्तकांचे नियमित वाचन ध्येयवेडे आणि यशस्वी व्यक्तिमत्त्व घडविण्यास मोलाची मदत करते, असे प्रतिपादन प्रा. मायाप्पा पाटील यांनी केले.

जायंट्स सखीच्या वतीने महिला विद्यालय, बेळगाव येथे आयोजित “वाचाल तर वाचाल” या विषयावरील व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जायंट्स सखीच्या अध्यक्षा सुलक्षणा शिनोळकर होत्या. व्यासपीठावर विभागीय संचालक संजय पाटील, फेडरेशन संचालक सुनील मुतगेकर, अपर्णा पाटील तसेच महिला विद्यालयाचे मुख्याध्यापक कृष्णाजी पाटील उपस्थित होते.

प्रा. पाटील पुढे म्हणाले की, आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि सोशल मीडियाचे वर्चस्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. घरातील पुस्तके धूळ खात पडली आहेत. विद्यार्थी असोत किंवा ज्येष्ठ नागरिक, सर्वच जण मोबाईलच्या आहारी जात आहेत. त्यामुळे पुस्तक वाचनाचे महत्त्व प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याची गरज निर्माण झाली आहे. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मार्क झुकेरबर्ग, सावित्रीबाई फुले, सुधा मूर्ती आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनचरित्रांतूनही वाचनाचे महत्त्व अधोरेखित होते, असे त्यांनी सांगितले.

अशी अनेक उदाहरणे देत प्रा. मायाप्पा पाटील यांनी विद्यार्थिनींना सातत्याने वाचन करण्याचे आवाहन केले. “भविष्यात तुम्ही वाचन केलेत तरच वाचाल,” असे सांगत त्यांनी चांगल्या पुस्तकांशी मैत्री करण्याचा आणि दररोज वाचनाची सवय लावण्याचा संदेश दिला.

प्रास्ताविकात अध्यक्षा सुलक्षणा शिनोळकर यांनी जायंट्स सखीतर्फे सातत्याने शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविले जात असल्याची माहिती दिली. मुख्याध्यापक कृष्णाजी पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी शेकडो विद्यार्थिनी उपस्थित होत्या. तसेच जायंट्स सखीच्या माजी अध्यक्षा शीतल पाटील, उपाध्यक्षा राजश्री हसबे, स्वाती फडके, अर्चना कंग्राळकर, वैशाली भातकांडे, वरदा अंगडी, सुवर्णा काळे, सुलोचना कुट्रे, शीतल नेसरीकर, नीलिमा करंजीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दीपा पाटील यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *