Sunday , September 20 2026
Breaking News

गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी सर्व विभागांची तातडीची बैठक घेण्याची मागणी; मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Spread the love

बेळगाव : आगामी १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत होणाऱ्या १२ दिवसीय सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक नागरी सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासनाची पूर्वतयारी सुनिश्चित करण्यासाठी सर्व संबंधित विभागांची संयुक्त बैठक तातडीने बोलवावी, अशी मागणी मध्यवर्ती गणेश उत्सव महामंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, बेळगावातील सार्वजनिक गणेशोत्सव हा राज्यातील प्रमुख उत्सवांपैकी एक असून, शेकडो गणेश मंडळे या उत्सवात सहभागी होतात. त्यामुळे उत्सव शांततापूर्ण, सुरक्षित आणि सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासनाने आगाऊ नियोजन करणे आवश्यक आहे.

महामंडळाने सिंगल विंडो परवानगी केंद्र, शहरातील खराब रस्त्यांची तातडीने दुरुस्ती, मंडळ परिसरातील स्वच्छता, सुरक्षित वीजपुरवठा, मिरवणूक मार्गावरील झाडांच्या फांद्यांची छाटणी, सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था, उघड्या गटारांवर झाकणे, ग्रामीण भागातील भाविकांसाठी अतिरिक्त रात्रीच्या बससेवा, हॉटेल व अत्यावश्यक व्यावसायिक आस्थापनांना उशिरापर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी, तसेच विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी वनिता विद्यालय ते धर्मवीर संभाजी चौक दरम्यान तात्पुरत्या प्रेक्षक गॅलरीची उभारणी करण्याची मागणी केली आहे.

याशिवाय, गणेशमूर्ती कार्यशाळांकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती, गणेश मंडळांना तात्पुरत्या वीजजोडणीसाठी हेस्कॉमकडून लागू करण्यात आलेल्या इन्डेम्निटी बाँडच्या अटींचा पुनर्विचार करण्याचीही विनंती करण्यात आली आहे.

निवेदनात आरोग्य विभागाने प्रथमोपचार, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, संसर्गजन्य रोग प्रतिबंध, स्वच्छता, रक्तदान, अवयवदान, सीपीआर प्रशिक्षण, रस्ते सुरक्षा आणि मानसिक आरोग्य याबाबत जनजागृती अभियान राबवावे, तसेच प्रमुख मंडळांमध्ये आरोग्य माहिती केंद्रे, मोबाईल वैद्यकीय पथके आणि आपत्कालीन प्रतिसाद पथके तैनात करावीत, अशी मागणीही करण्यात आली आहे.

तसेच गणेशोत्सवाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, पर्यावरण संरक्षण, डिजिटल सुरक्षा, नागरी जबाबदारी, केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती, युवकांसाठी करिअर मार्गदर्शन, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता, स्टार्टअप प्रोत्साहन, क्रीडा व युवा कल्याण योजना आणि डिजिटल इंडिया अभियानाची माहिती देणारे उपक्रम राबवावेत, अशीही सूचना निवेदनात करण्यात आली आहे.

मध्यवर्ती गणेश उत्सव महामंडळाने जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची आणि महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची लवकरात लवकर पूर्वतयारी बैठक बोलावून सर्व मागण्यांवर निर्णय घ्यावा, जेणेकरून यंदाचा गणेशोत्सव अधिक सुरक्षित, सुव्यवस्थित आणि यशस्वीरीत्या पार पडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

यावेळी महामंडळाचे अध्यक्ष श्री. रमाकांतदादा कोंडुस्कर, कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील, कार्यकारी सचिव प्रा. आनंद आपटेकर, संपर्कप्रमुख विकास कलघटगी, उपाध्यक्ष सागर पाटील, सरचिटणीस महादेव पाटील, तसेच सुनील बोकडे, प्रसाद मरगाळे, दुर्गाप्रसाद जोशी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *