Sunday , September 20 2026
Breaking News

कॅन्टोन्मेंटच्या विकासाला मोठी झेप; १४.६० कोटींच्या महत्त्वाकांक्षी आराखड्याला मंजुरी

Spread the love

 

फूड कोर्ट, शॉपिंग-ऑफिस कॉम्प्लेक्स, ओपन एअर थिएटरसह आधुनिक सुविधांची उभारणी; महसूलवाढ, रोजगारनिर्मिती आणि आत्मनिर्भरतेकडे कॅन्टोन्मेंटची वाटचाल

बेळगाव : कॅन्टोन्मेंट क्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि महसुलाचे नवे स्रोत निर्माण करण्याच्या दृष्टीने १४.६० कोटी रुपयांच्या अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्लॅनला मंजुरी मिळाली आहे. अर्बन चॅलेंज फंड योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे आधुनिक पायाभूत सुविधा उभारल्या जाणार असून स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्याबरोबरच कॅन्टोन्मेंट बोर्ड आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम आणि आत्मनिर्भर होणार आहे.

या विकास आराखड्यासाठी १४.६० कोटी रुपयांचा निधी तीन टप्प्यांत उभारला जाणार आहे. भारत सरकारकडून २५ टक्के म्हणजे ३.६५ कोटी रुपयांचे अनुदान मिळणार असून, कॅन्टोन्मेंट बोर्डही ३.६५ कोटी रुपयांचा हिस्सा उचलणार आहे. उर्वरित ७.३० कोटी रुपयांचा निधी बँक कर्ज किंवा सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) माध्यमातून उभारला जाईल. या प्रकल्पांतून भविष्यात मिळणाऱ्या महसुलातून कर्जाची परतफेड केली जाणार असल्याने बोर्डाच्या उत्पन्नात मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

आराखड्यानुसार, आयनॉक्स थिएटरजवळील हेड पोस्ट ऑफिस रस्त्यावर १.५१ कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक फूड कोर्ट उभारण्यात येणार आहे. तसेच जीएलआर सर्व्हे क्रमांक २६९ मधील होंडा शोरूमसमोर ६.०७ कोटी रुपये खर्चून शॉपिंग व ऑफिस कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार असून, व्यापारी व्यवहारांना नवी चालना मिळणार आहे.

याशिवाय कम्युनिटी हॉल परिसरात ३.७५ कोटी रुपये खर्चून ओपन एअर थिएटर आणि बहुउद्देशीय हॉल उभारण्यात येणार आहे. त्यामुळे सांस्कृतिक, सामाजिक तसेच सार्वजनिक कार्यक्रमांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे कॅन्टोन्मेंट परिसराचा सर्वांगीण विकास होण्याबरोबरच महसूलवाढ, रोजगारनिर्मिती, व्यापारी उलाढालीत वाढ आणि नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध होणार असल्याने हा आराखडा कॅन्टोन्मेंटच्या विकासासाठी ‘गेमचेंजर’ ठरणार असल्याचे मानले जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *