Sunday , September 20 2026
Breaking News

नीट आंदोलनातील घोषणांच्या निषेधार्थ बेळगावात भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन

Spread the love

 

बेळगाव : नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर तसेच बंगळुरूमध्ये भाजप आमदारावर अंडीफेक करण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने बेळगावात तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान काँग्रेस भवनाकडे मोर्चा नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिसांनी मोर्चा अडविल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

राणी चन्नम्मा चौकातून निघालेल्या मोर्चात भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत काँग्रेस सरकारविरोधात निषेध व्यक्त केला. काँग्रेस भवनाकडे जात असताना पोलिसांनी बॅरिकेड्स उभारून मोर्चा रोखला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद व किरकोळ धक्काबुक्की झाली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत कार्यकर्त्यांना पुढे जाण्यापासून रोखले.

भाजप नेत्यांनी आरोप केला की, आंदोलनाच्या नावाखाली पंतप्रधानांचा अवमान करण्यात आला असून देशविरोधी घोषणाबाजी करण्यात आली. या प्रकरणातील संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

भाजपचे राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके यांनी विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पक्षाचा पाठिंबा असल्याचे सांगत, आंदोलनाचा राजकीय हेतूंसाठी वापर होऊ नये, असे मत व्यक्त केले. तर माजी आमदार अरविंद पाटील यांनी बंगळुरूमधील अंडीफेक प्रकरणाचा निषेध करत राज्य सरकारवर टीका केली.

यानंतर माजी आमदार महांतेश कवटगीमठ यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. आंदोलनातील व्हिडिओंची तपासणी करून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर आणि पंतप्रधानांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.

या आंदोलनात भाजपचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार संजय पाटील, महांतेश कवटगीमठ, भाजप महानगर अध्यक्षा गीता सुतार, माजी आमदार अनिल बेनके, महांतेश दोड्डगौडर, विश्वनाथ पाटील, अरविंद पाटील, डॉ. सोनाली सरनोबत यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *