


बेळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या आणि शहराच्या वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या बहुचर्चित उड्डाणपूल प्रकल्पाच्या उभारणीच्या दिशेने अखेर निर्णायक हालचाली सुरू झाल्या आहेत. धर्मवीर संभाजी चौक येथे मागील दोन दिवसांपासून बॅरिकेड्स उभारून जिओ-टेक्निकल तपासणी आणि माती परीक्षणाचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, त्यामुळे प्रत्यक्ष उड्डाणपूल उभारणीच्या कामाला लवकरच प्रारंभ होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी उड्डाणपूल प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती दिली होती. त्याचबरोबर प्रकल्पाच्या मार्गातील भूमिगत ड्रेनेज, वीजवाहिन्या, पाणीपुरवठा पाइपलाइन आणि अन्य सार्वजनिक सुविधांचे स्थलांतर तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर आता प्रत्यक्ष तांत्रिक सर्वेक्षण सुरू झाल्याने प्रकल्पाच्या अंमलबजावणीला वेग मिळाल्याचे स्पष्ट होत आहे.
बेळगाव शहरातील दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्गापासून धर्मवीर संभाजी चौकापर्यंत उड्डाणपूल उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. शहराच्या वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पाकडे बेळगावकरांचे लक्ष लागून आहे.
इन्फ्रास्पोर्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट प्रा. लि. यांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या साहाय्याने माती परीक्षण केले जात आहे. या प्रक्रियेत मातीचा दर्जा, भूगर्भीय संरचना, पाण्याची पातळी, जमिनीची भारवाहक क्षमता आणि पायाभूत बांधकामासाठी आवश्यक तांत्रिक बाबींचा सखोल अभ्यास केला जाणार आहे. या अहवालाच्या आधारे उड्डाणपुलाच्या पायाभरणीचा अंतिम आराखडा निश्चित करण्यात येणार आहे.
माती परीक्षणाला सुरुवात झाल्याने अनेक वर्षांपासून केवळ घोषणांमध्ये अडकलेल्या उड्डाणपूल प्रकल्पाला आता प्रत्यक्ष गती मिळाल्याचे चित्र आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होताच बांधकामाला प्रारंभ होण्याची शक्यता असून, शहरातील वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय ठरणाऱ्या या प्रकल्पाबाबत बेळगावकरांच्या अपेक्षा पुन्हा एकदा उंचावल्या आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta