Sunday , September 20 2026
Breaking News

कर्नाटक मंत्रिमंडळ विस्ताराला वेग, बुधवारी शपथविधीची दाट शक्यता

Spread the love

 

बेंगळुरू : नीट परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे काही दिवस रखडलेला कर्नाटक मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिल्लीला रवाना होणार असून, बुधवारी मंत्रिमंडळ विस्तारासह नव्या मंत्र्यांचा शपथविधी होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

गेल्या सोमवारी दिल्लीत मंत्रिमंडळ विस्तारावर महत्त्वाची बैठक होणार होती. मात्र, नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर उभ्या राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे आणि त्यात काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी लक्ष घातल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आली होती. आता केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आंदोलन शांत झाल्याने काँग्रेसने पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग दिला आहे.

काँग्रेसच्या उच्चपदस्थ सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्रिपदासाठीच्या नावांची यादी जवळपास अंतिम झाली असून केवळ अंतिम मंजुरी आणि शपथविधीचा मुहूर्त निश्चित करणे बाकी आहे. अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि रणदीपसिंह सुरजेवाला यांनी संभाव्य मंत्र्यांच्या नावांवर यापूर्वीच सविस्तर चर्चा करून यादी तयार केली आहे.

सोमवारी दिल्लीत होणाऱ्या बैठकीत या यादीवर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असून, त्यानंतर राहुल गांधी यांची मंजुरी घेत मंत्रिमंडळ विस्ताराची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. राजकीय वर्तुळात बहुतांश नावांवर एकमत झाल्याचे मानले जात असून, बुधवारी नव्या मंत्र्यांचा शपथविधी जवळपास निश्चित असल्याची चर्चा रंगली आहे.

कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या स्थापनेनंतरचा हा महत्त्वाचा मंत्रिमंडळ विस्तार मानला जात असून, अनेक इच्छुक आमदारांचे भवितव्य या निर्णयावर अवलंबून आहे. त्यामुळे दिल्लीतील बैठकीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *