Monday , July 27 2026
Breaking News

देशसेवेसाठी तरुणांनी सदैव सज्ज राहावे : निवृत्त सुभेदार बाबासाहेब मालगावे

Spread the love

 

शिवानंद महाविद्यालयात कारगिल विजय दिवस साजरा

कागवाड : “भारतीय सैन्याच्या शौर्याची गाथा म्हणून कारगिल विजय दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. हा दिवस आपल्याला त्या शूर जवानांच्या बलिदानाची आठवण करून देतो, ज्यांनी हसत-हसत मातृभूमीसाठी प्राणार्पण केले. कारगिल युद्धात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला. अन्न नव्हते, झोप नव्हती, वातावरणही अनुकूल नव्हते; तरीही भारतीय सैन्याने अदम्य धैर्य, शौर्य आणि जिद्दीच्या बळावर विजय संपादन केला. आमचे बंकर शत्रूच्या हल्ल्यांत उद्ध्वस्त होत असताना देखील आम्ही खंबीरपणे लढलो आणि हा ऐतिहासिक विजय मिळवला. या पराक्रमाची प्रेरणा घेऊन तरुणांनी देशसेवेसाठी सदैव तयार राहिले पाहिजे,” असे प्रतिपादन निवृत्त सुभेदार बाबासाहेब मालगावे यांनी केले.

शिवानंद महाविद्यालयाच्या एनसीसी विभागातर्फे आयोजित कारगिल विजय दिवस कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. तळवार होते. व्यासपीठावर संस्थेचे सेक्रेटरी प्रो. बी. ए. पाटील, प्रशासक मेजर व्ही. एस. तुगशेट्टी, पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. पी. बी. नंदाळे तसेच एनसीसी अधिकारी लेफ्टनंट अशोक आलगोंडी उपस्थित होते.

प्रारंभी कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना कँडल लायटिंगद्वारे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत लेफ्टनंट अशोक आलगोंडी यांनी केले, तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय कॅडेट चिदानंद डागे यांनी करून दिला.
यावेळी मेजर व्ही. एस. तुगशेट्टी यांनी कारगिल युद्धाचा इतिहास उलगडून सांगताना, १९९९ मध्ये लडाखमधील कारगिल परिसरातील पर्वतशिखरांवर घुसखोरी केलेल्या पाकिस्तानी सैन्याला भारतीय जवानांनी पराक्रमाने परतवून लावल्याची माहिती दिली. सुरुवातीला पाकिस्तानने या युद्धातील सहभाग नाकारला; मात्र भारताने पुराव्यांसह त्यांचे खरे स्वरूप जगासमोर आणले आणि घुसखोरांना माघारी पाठवले. यावेळी एनसीसी कॅडेट्सनीही आपले मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगतात डॉ. एस. पी. तळवार म्हणाले, “अलीकडे समाजात देशभक्तीची भावना कमी होत चालल्याचे दिसून येते. कारगिल युद्धातील शौर्यकथा ऐकल्या किंवा वाचल्या की अंगावर शहारे उभे राहतात. कारगिल विजय दिवस साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे युद्धात योगदान दिलेल्या भारतीय जवानांचे स्मरण करून त्यांच्या त्यागातून व पराक्रमातून प्रेरणा घेणे हा आहे.”
कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, एनसीसी विद्यार्थी तसेच कागवाड येथील माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅडेट उषा कोकणे यांनी केले, तर ज्युनिअर अंडर ऑफिसर राजश्री काडापुरे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

अध्यक्षपदाच्या निवडीवरून बेळगाव काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

Spread the love  शहराध्यक्ष निवडीसाठी सुरू असलेल्या मतमतांतर बैठकीत वाद; पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *