Sunday , September 20 2026
Breaking News

बीपीएल शिधापत्रिकाधारकांसाठी महत्त्वाची सूचना : पाच वर्षे पूर्ण झाल्यास ई-केवायसी पुन्हा बंधनकारक

Spread the love

 

शुल्क मागितल्यास तक्रार करा

बेळगाव : अपात्र बीपीएल शिधापत्रिकांवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून, प्रत्येक पाच वर्षांनी ई-केवायसी (e-KYC) करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात ज्या बीपीएल शिधापत्रिकाधारकांच्या ई-केवायसीला सप्टेंबर २०२६ पर्यंत पाच वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यांनी तातडीने पुन्हा ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार विभागाने केले आहे.

या संदर्भातील लाभार्थ्यांची माहिती एनआयसी (NIC) कडून प्राप्त झाली असून ती रास्त भाव दुकाननिहाय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांनी आपल्या संबंधित रास्त भाव दुकानात जाऊन माहितीची खातरजमा करून आवश्यक ती ई-केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. वेळेत ई-केवायसी न केल्यास शिधापत्रिकेच्या लाभावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, ई-केवायसीसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही, हे विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोणत्याही रास्त भाव दुकानदाराने ई-केवायसीच्या नावाखाली पैसे मागितल्यास किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार आढळल्यास संबंधित तालुक्याचे तहसीलदार, सहाय्यक संचालक, अन्नप्रमुख किंवा अन्ननिरीक्षक यांच्याकडे तातडीने तक्रार दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार विभागाच्या उपसंचालकांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती देत, पात्र लाभार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या रास्त भाव दुकानातूनच विनामूल्य ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *