


बेळगाव : बेळगाव महापालिकेत ‘बेळगाव हा कर्नाटकाचा अविभाज्य भाग आहे’ असा ठराव तातडीने मंजूर करावा, या मागणीसाठी कन्नड संघटनांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. या मागणीसाठी कन्नड संघटनांच्या प्रतिनिधींनी नगरविकास मंत्री यतिंद्र सिद्दरामय्या यांची भेट घेत सरकारने यामध्ये हस्तक्षेप करून महापालिकेत संबंधित ठराव मंजूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली.
बेळगाव दौऱ्यावर असलेल्या मंत्री सिद्दरामय्या यांच्यासमोर कन्नड संघटनांच्या प्रतिनिधींनी आपली भूमिका मांडली. यापूर्वीही मुख्यमंत्री, मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात निवेदने सादर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ठराव मंजूर न झाल्यास महापालिका बरखास्त करण्याची मागणीही काही कन्नड संघटनांकडून करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.
या मागणीवर मराठी भाषिक संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. लोकशाही पद्धतीने कार्यरत असलेल्या महापालिकेवर अशा प्रकारे राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका मराठी संघटनांनी केली आहे.
दरम्यान, कन्नड संघटनांच्या मागणीवर प्रतिक्रिया देताना मंत्री यतिंद्र सिद्दरामय्या यांनी ‘बेळगाव हे कर्नाटकाचा अविभाज्य भाग आहे,’ अशी भूमिका पुन्हा स्पष्ट केली. मात्र, सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना आणि मराठी भाषिकांच्या भावना विचारात न घेता मंत्र्यांनी एकतर्फी भूमिका घेतल्याची टीका मराठी भाषिक संघटनांकडून करण्यात येत आहे.
संबंधित पत्र आपल्या निदर्शनास आलेले नसल्याचे सांगत मंत्री सिद्दरामय्या यांनी संपूर्ण माहिती घेऊन कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. तसेच या ठरावाच्या मुद्द्यावर सरकारवर कोणताही राजकीय दबाव नसल्याचा दावाही त्यांनी केला. त्यामुळे या मागणीवर सरकारची पुढील भूमिका काय राहणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta