


बेळगाव : सुवर्ण विधानसौध येथे नगरविकास मंत्री डॉ. यतिंद्र सिद्दरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली बेळगाव महापालिका आणि बुडाच्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. विकासकामांमध्ये दिरंगाई आणि हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना मंत्र्यांनी कडक शब्दांत सुनावत कामात कोणतीही कुचराई खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा दिला.
बेळगाव, धारवाड आणि कलबुर्गी शहरांमध्ये एल अँड टी कंपनीकडून सुरू असलेल्या कामांना होत असलेल्या विलंबाबाबत मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विकासकामांसाठी खोदलेले रस्ते काम पूर्ण झाल्यानंतर तातडीने पूर्ववत करण्यात यावेत, अन्यथा संबंधित कामांचा पुढील निधी रोखण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर आर्थिक दंडासह शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
ग्रामीण भारत विकास योजनेअंतर्गत सुमारे ९० टक्के कामे पूर्ण झाल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले असले तरी प्रत्यक्षात अनेक कामे अर्धवट असल्याचा मुद्दा दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील यांनी उपस्थित केला. यावर केवळ कागदोपत्री कामे पूर्ण दाखवून चालणार नाही, तर प्रत्यक्षात कामे पूर्ण झाली पाहिजेत, असे मंत्री सिद्दरामय्या यांनी स्पष्ट केले. अर्धवट कामांची तातडीने पाहणी करून आवश्यक असल्यास अतिरिक्त निधीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
फ्लोरा मतीर्थ नगर येथील बुडा वसाहत महापालिकेकडे हस्तांतरित करण्यासह तेथील उर्वरित विकासकामांचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला. लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीने प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून पुढील बैठकीत अहवाल सादर करावा, असे निर्देश मंत्र्यांनी दिले.
₹१०० च्या बॉण्ड पेपरवर विकसित करण्यात आलेल्या ले-आऊट्सना शासकीय रस्त्याशी जोडणी देताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींबाबतही चर्चा झाली. खासगी जमिनीतून रस्ता जात असल्यास आवश्यक जमीन शासनाने संपादित करून तो सार्वजनिक रस्ता म्हणून घोषित करण्याच्या पर्यायावरही विचार करण्यात आला.
बैठकीला महापौर प्रीती कामकर, उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ, बुडाचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, महापालिका आयुक्त कार्तिक एम. तसेच बुडाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta