


बेळगाव : शहरात बेफाम वाहन चालवणे पुन्हा एकदा जीवघेणी ठरली. शाळेत कर्तव्यावर जाणाऱ्या एका शिक्षिकेच्या दुचाकीला भरधाव कारने जोरदार धडक देऊन गंभीर अपघात घडविला. धडक दिल्यानंतर जखमी शिक्षिकेला रस्त्याच्या कडेला बसवून कारचालकाने घटनास्थळावरून पलायन केल्याने संतापाची लाट उसळली आहे.
माहितीनुसार, टिळकवाडी येथील सरकारी मराठी मुलांची शाळा क्रमांक ९ मधील शिक्षिका राजश्री वराळे या सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे आजमनगर येथून राणी चन्नम्मा चौकाकडील शाळेत जाण्यासाठी दुचाकीवरून निघाल्या होत्या. याचवेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडकेची तीव्रता इतकी होती की, राजश्री वराळे या रस्त्यावर फेकल्या गेल्या. अपघातानंतर कारचालकाने काही क्षण त्यांना रस्त्याच्या बाजूला बसविले; मात्र कोणतीही मदत न करता किंवा पोलिसांना माहिती न देता तेथून पळ काढला.
या अपघातात राजश्री वराळे यांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फरार कारचालकाचा शोध घेतला जात आहे.
शहरात भरधाव वाहनांमुळे अपघातांची मालिका सुरूच असून, वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. निष्पाप नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या बेफाम वाहनचालकांवर लगाम घालण्याची गरज या घटनेने पुन्हा अधोरेखित केली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta