Sunday , September 20 2026
Breaking News

बेळगावात शेतकऱ्यांचा एल्गार; ‘दुष्काळ जाहीर करा, शेतकरी वाचवा’च्या घोषणांनी शहर दणाणले

Spread the love

 

 

बेळगाव : राज्यातील दुष्काळी परिस्थिती, पिकांचे वाढते नुकसान आणि शेतकऱ्यांसमोरील आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी बेळगावात हजारो शेतकऱ्यांनी भव्य मोर्चा काढून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि हरित सेनेच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात राज्याध्यक्ष वासुदेव मेटी, प्रा. एम. डी. नंजुंडस्वामी यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी, महिला शेतकरी आणि पदाधिकारी सहभागी झाले.

राणी चन्नम्मा चौकातून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी आंदोलकांनी काही काळ मानवी साखळी उभारून वाहतूक रोखली आणि शासनाच्या कृषी धोरणांविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला.

मोर्चादरम्यान राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करावा, शेती कर्जमाफीची अंमलबजावणी करावी, प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती द्यावी तसेच शेतकऱ्यांना पुरेसे खत व बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. अपुऱ्या पावसामुळे पेरणीवर मोठा खर्च करूनही पिके करपल्याने अनेक शेतकरी संकटात सापडल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला.

वासुदेव मेटी यांनी रायबाग आणि मूडलगी तालुक्यातील शेवटच्या भागापर्यंत कालव्याचे पाणी पोहोचत नसल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसत असल्याचे सांगितले. संकटग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात थेट प्रति एकर ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई जमा करावी, अशी मागणी त्यांनी केली.

ऊस आणि मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांनी तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा करावी, अशी मागणीही करण्यात आली. तसेच खत व बियाण्यांच्या वितरणातील नियम शिथिल करून सर्व शेतकऱ्यांना कोणताही अडथळा न येता खत उपलब्ध करून द्यावे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी किमान ६० दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.

मोर्चाच्या शेवटी आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करून प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करत आंदोलनाची सांगता झाली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *