Friday , July 31 2026
Breaking News

सेवानिवृत्ती विशेष लेख : विद्यार्थीप्रिय शिक्षक एस. डी. पाटील सर

Spread the love

 

सन 1988 मध्ये शिक्षकी पेशात पदार्पण केलेल्या श्री. एस. डी. पाटील सरांनी आपल्या 38 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक विद्यार्थी घडवले. विषयाचे सखोल ज्ञान, विद्यार्थीप्रिय स्वभाव आणि शिस्तप्रिय अध्यापनशैलीमुळे ते विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही लोकप्रिय आहेत. असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले एस. डी. पाटील सर हे आपल्या शिक्षकी पेशातून दि. 31 जुलै 2026 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त त्यांच्याविषयी थोडेसे.

श्रीयुत एस. डी. पाटील यांचे पूर्ण नाव समरसेन दत्तात्रय पाटील असे असून त्यांचा जन्म दि. 21 जुलै 1966 रोजी किणये, ता. बेळगाव येथे एका मध्यमवर्गीय, सात्त्विक, प्रेमळ शेतकरी कुटुंबात झाला. आई निरक्षर तर वडील अल्पशिक्षित, पण शिक्षणप्रेमी होते. त्यामुळे वडिलांना वाचनाची आवड होती. वेळ मिळेल तेव्हा वडील रामायण, महाभारत, पांडवप्रताप ही आणि यांसारखी पुस्तके वाचायचे. त्यामुळेच लहानपणापासूनच वाचनाचे संस्कार एस. डी. पाटील यांच्यावर घरीच झाले.

एस. डी. पाटील यांचे प्राथमिक शिक्षण गावातील प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेत, किणये येथे झाले. ते कुशाग्र बुद्धीचे असल्यामुळे शिक्षकांनी शिकविलेले लगेच ग्रहण करायचे. त्यामुळे शाळेत ते एक हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जायचे. वाचनाचे बाळकडू तर घरीच मिळाले होते. त्यामुळे शाळेच्या वाचनालयातील पुस्तकांचा विद्यार्थीदशेतच त्यांनी फडशा पाडला होता. असा हुशार विद्यार्थी कोणाला आवडणार नाही? ते शाळेतील सर्व शिक्षकांच्या गळ्यातील ताईत बनले. विशेषतः एम. बी. बाळेकुंद्री गुरुजी आणि के. के. भारती गुरुजी यांच्या शिकवणुकीचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला. वाचनाचा छंद तर होताच. अशातच एकदा शाळेच्या वाचनालयात “श्यामची आई” हे साने गुरुजींचे पुस्तक त्यांच्या हाती लागले. अन् त्यांनी झपाटल्यासारखे त्या पुस्तकाचे अनेकदा पारायण केले. त्या पुस्तकाचा आजही त्यांच्यावर प्रभाव आहे. अफाट वाचन, चांगली पाठांतरशक्ती आणि बाळेकुंद्री गुरुजींनी सांगितलेला गोष्टीरूप इतिहास ऐकून त्यांच्यामध्ये बालपणीच वक्तृत्वकलेचे बीजारोपण शालेय जीवनातच झाले. आणि पुढे ते एक वक्ते म्हणून नावारूपाला आले.

प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. आता पुढे काय? हा प्रश्न त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना पडला नाही. कारण घरची आर्थिक परिस्थिती जरी बेताची असली, तरी त्यांचे वडील शिक्षणप्रेमी होते आणि त्यांना शिक्षणाचे महत्त्व माहीत होते. त्यामुळे त्यांनी इयत्ता आठवीसाठी गावातीलच मराठा मंडळ हायस्कूल, किणये येथे प्रवेश घेऊन याच शाळेत दहावीपर्यंतचे माध्यमिक शिक्षण चांगल्या गुणांनी यशस्वीपणे पूर्ण केले.

दहावीनंतर त्यांनी बेळगाव येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या ज्योती पदवीपूर्व महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेतला. येथे शिकत असताना त्यांना ज्योती महाविद्यालयाचे माजी प्राचार्य एस. वाय. पाटील सर इतिहास विषय शिकवायचे. एस. वाय. पाटील सरांचे वैशिष्ट्य म्हणजे ते विषय सोप्या आणि रंजक पद्धतीने शिकवायचे. त्यामुळे शिक्षणाचे माध्यम जरी इंग्रजी असले तरी विषय विद्यार्थ्यांना सहज आकलन होत असे. त्यामुळे एस. डी. पाटील हे सरांच्या शिकवणुकीने प्रभावित झाले; आणि इतिहास हा त्यांचा आवडता विषय झाला. आणि पुढे ते इतिहासाचेच शिक्षक झाले. आजही त्यांच्या जीवनात प्राचार्य एस. वाय. पाटील सर आणि प्राचार्य व्ही. ए. पाटील सर हेच त्यांचे आदर्श आहेत.

बारावीनंतर भाऊराव काकतकर पदवी महाविद्यालयात प्रवेश घेऊन सन 1988 साली त्यांनी कला शाखेतून बी. ए. ही पदवी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली.

शालेय जीवनातच मुले आपण भविष्यात कोण होणार हे ठरवतात. तसेच एस. डी. पाटील यांनीही ठरवले होते की, आपणही शिक्षकच व्हायचे. कारण त्यांच्यावर बाळेकुंद्री आणि भारती गुरुजींचा प्रभाव होता. बी. ए. पदवी घेतल्यानंतर त्यांनी 1988 साली ज्ञानेश्वरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष, जिल्हा पंचायतीचे माजी सदस्य सुरेश डुकरे, एस. डी. पाटील आणि त्यांच्या सहकारी मित्रांनी गावात सरस्वती विद्यामंदिर ही शाळा सुरू केली आणि त्याच शाळेत ते शिक्षक म्हणून रुजू झाले.

शिक्षक व्हायचे असेल तर बी. एड् केलेच पाहिजे. म्हणून सन 1992 साली त्यांनी बेळगाव येथील संगोळी रायाणा शिक्षण महाविद्यालयात प्रवेश घेऊन बी. एड्. अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केला. आणि खऱ्या अर्थाने ते शिक्षक म्हणून सेवा बजावू लागले.

त्यांचा अध्यापनाचा विषय जरी इतिहास असला तरी सुरुवातीला ते इंग्रजी हा विषय शिकवायचे. पी. पी. बेळगावकर सर म्हणतात, “शिक्षकाने किमान आपल्या अध्यापनाच्या विषयात तरी पारंगत असले पाहिजे आणि विषयाची पूर्ण तयारी करूनच वर्गात गेले पाहिजे. तरच अध्यापन प्रभावी होते!” त्याप्रमाणे एस. डी. पाटील सर आपल्या विषयाची पूर्ण तयारी करूनच वर्गात जायचे. यामुळे इंग्रजीसारखा विषयही ते सुलभ करून शिकवायचे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयात आवड निर्माण होत असे आणि विद्यार्थी त्यांच्या तासाला तल्लीन होत असत.

38 वर्षांच्या सेवेपैकी 22 वर्षे त्यांनी विनाअनुदानित काम केले. सरस्वती विद्यामंदिर ही शाळा दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ या शैक्षणिक संस्थेशी जोडण्यापूर्वी त्यांना काहीच मानधन मिळत नव्हते. जेव्हा ही शाळा दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ या संस्थेशी जोडली गेली, तेव्हा त्यांना थोडेफार मानधन सुरू झाले.

जीवनात अनेक चढ-उतार आले, पण ते डगमगले नाहीत. प्रत्येक संकटाशी धैर्याने तोंड देत ते खंबीरपणे उभे राहिले. आणि प्रतिकूल परिस्थितीवर यशस्वीपणे मात केली.

सन 2010 साली त्यांच्या शाळेला सरकारी अनुदान मिळाले. आणि एवढ्या वर्षांच्या त्यांच्या प्रयत्नांना यश आले. त्यामुळे त्यांचे कष्ट फलद्रूप झाले. सरस्वती विद्यामंदिर येथे 24 वर्षे सेवा बजावल्यानंतर सन 2012 साली त्यांची देसूर हायस्कूल, देसूर या शाळेत बदली झाली. याठिकाणी सात वर्षे सेवा बजावत असतानाच त्यांच्या कार्याची दखल घेऊन संस्थेने त्यांना त्याच शाळेत मुख्याध्यापक म्हणून बढती दिली.महत्वाची गोष्ट म्हणजे पाटील सरांनी एकादी जबाबदारी हाती घेतली,तर ती तडीला नेल्याशीवाय ते गप्प बसत नाहीत. या त्यांच्या झोकून देऊन काम करण्याच्या पध्दतीमुळे सन 2016 साली त्यांना दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संस्थेने मंडळाचे सभासदत्व बहाल केले तर 2025 साली त्यांची सेवाभावी वृत्ती पाहून, त्यांना मंडळामध्ये संचालक म्हणून घेण्यात आले.देसूर येथेसात वर्षे सेवा बजावल्यानंतर त्यांची दि. 10 जून 2017 साली खानापूर तालुक्यातील बैलूर या गावी बदली झाली. छत्रपती संभाजी हायस्कूल, बैलूर या शाळेत आठ वर्षे मुख्याध्यापक म्हणून काम केल्यानंतर दि. 10 जून 2025 रोजी त्यांची बेळगाव तालुक्यातील व्ही. एस. पाटील हायस्कूल, मच्छे येथे बदली झाली. या शाळेत एक वर्ष मुख्याध्यापक म्हणून कार्य करून दि. 31 जुलै 2026 रोजी ते आपल्या शिक्षकी पेशाच्या 38 वर्षांच्या सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत.

किणये, देसूर आणि बैलूर येथे काम करत असताना तिन्ही शाळांच्या इमारतींचे बांधकाम त्यांच्या कार्यकाळात त्यांच्याच नियोजनाने झाले. त्यांच्या 38 वर्षांच्या सेवेमध्ये त्यांनी 35 वर्षे मुख्याध्यापक म्हणून कार्य केले. पण शाळेतील सहकारी शिक्षकांना कधीच त्रास दिला नाही, तर सर्वांना समजून घेऊन काम केले. सगळ्यांना एकत्र घेऊन काम करण्याची पद्धत आणि पारदर्शक व्यवहार यामुळे जनमाणसात त्यांची चांगली प्रतिमा निर्माण झाली आहे.

“शिकविणे म्हणजे केवळ पाठ्यपुस्तक, अभ्यासक्रम पूर्ण करणे नव्हे, तर माणूस घडविणे आहे.” हा मंत्र एस. डी. पाटील यांनी आयुष्यभर जपला. कडक शिस्त आणि मायेचा ओलावा यांचा सुरेख संगम म्हणजे पाटील सर!

आपल्या सेवाकाळात त्यांनी केवळ अभ्यासच नाही, तर क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, विज्ञान प्रदर्शन यांसारख्या उपक्रमांमध्येही मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे आज त्यांचे विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. हीच त्यांच्या कार्याची पोचपावती आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या आठवणी, आपण दिलेले ज्ञान आणि संस्कार हीच आपली खरी कमाई आहे.पाटील सरांच्या या कार्यात त्यांच्या सहचारिणी सौ.समीक्षा पाटील यांचाही हातभार आहे,हे विसरून चालणार नाही.
निवृत्तीनंतरच्या दुसऱ्या इनिंगसाठी मनापासून शुभेच्छा. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आरोग्य, दीर्घायुष्य आणि समाधान लाभो, हीच सदिच्छा!

– शिवाजी हसनेकर, उचवडे

About Belgaum Varta

Check Also

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्यावतीने २३ ऑगस्ट रोजी मराठी व्याकरण, हस्ताक्षर व निबंध स्पर्धांचे आयोजन

Spread the love  बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी, बेळगाव यांच्या कार्यकारिणीची बैठक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *