


“जो आवडे सर्वांना, तोच आवडे देवाला…” या उक्तीप्रमाणे कै. विनोद प्रकाश भागवत यांच्या अकस्मात निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्यांचे अचानक झालेले निधन मनाला कायमचा चटका लावून गेले. पत्नी नगरसेविका नेत्रावती भागवत आणि मुलांसोबत आदल्या दिवशी रात्रीपर्यंत ते आनंदाने वेळ घालवत होते. कुटुंबीयांशी मनमोकळ्या गप्पा झाल्या; मात्र नियतीने दुसऱ्याच दिवशी त्यांना कायमचे हिरावून नेले. सोमवार, दि. २० जुलै रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाला आज बारा दिवस पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा आणि व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला हा भावपूर्ण आढावा.

महाद्वार रोड, तिसरा क्रॉस येथील भागवत कुटुंबातील शेंडेफळ असलेले विनोद भागवत हे संपूर्ण कुटुंबाचा आधारस्तंभ होते. व्यवसायाने मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह (एमआर) असतानाही त्यांनी कुटुंबाची सर्व जबाबदारी समर्थपणे पार पाडली.
ते बेळगाव महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १५च्या नगरसेविका नेत्रावती भागवत यांचे पती होते. राजकारण आणि समाजसेवेची आवड असल्याने भाजपचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून ते सर्वपरिचित होते. २०१३ पासून दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकीय आणि सामाजिक कार्याला सुरुवात केली. त्यानंतर जनसेवा हेच त्यांचे ध्येय बनले.

कोरोना काळात गरजू नागरिकांना मदतीचा हात देत त्यांनी अनेक कुटुंबांना आधार दिला. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग होता.
२०२१ च्या महानगरपालिका निवडणुकीत त्यांनी पत्नी नेत्रावती भागवत यांना प्रभाग क्रमांक १५ मधून भाजपच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्यास प्रेरित केले. त्यांच्या विजयातही त्यांचे मोठे योगदान होते. त्यानंतर नगरसेविका म्हणून नेत्रावती भागवत यांच्या प्रत्येक सामाजिक कार्यात ते खंबीरपणे सहभागी राहिले.
राजकारण आणि समाजसेवेच्या माध्यमातून त्यांनी मोठा मित्रपरिवार आणि जनसंपर्क निर्माण केला होता. अलीकडे विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण (एसआयआर) मोहिमेतही त्यांनी पुढाकार घेतला होता. प्रभागातील पाणी, वीज, रस्ते तसेच इतर नागरी समस्यांच्या निराकरणासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिले. दिवस असो वा मध्यरात्र, नागरिकांच्या मदतीसाठी धावून जाणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती.
२०१९ मध्ये अतिवृष्टीमुळे महाद्वार रोड येथील त्यांचे जुने घर कोसळले होते. त्यानंतर त्यांच्या प्रयत्नांतून तत्कालीन मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या हस्ते नवीन घराचे भूमिपूजन करण्यात आले. अथक परिश्रम, जिद्द आणि कुटुंबाच्या सहकार्याने त्यांनी संसार उभा केला होता.

त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुले, भाऊ-बहिणी आणि मोठा आप्तपरिवार असा परिवार आहे. त्यांचे अकाली जाणे या संपूर्ण कुटुंबाला आणि असंख्य मित्र-हितचिंतकांना पोरके करून गेले.
कै. विनोद भागवत यांना विसरणे अशक्य आहे. त्यांच्या कार्याची, माणुसकीची आणि प्रेमळ स्वभावाची आठवण प्रत्येकाच्या मनात सदैव जिवंत राहील.
भागवत कुटुंबाचा आधारवड हरपला असला, तरी त्यांनी जपलेली माणसं आणि केलेली समाजसेवा हीच त्यांची खरी ओळख राहील.
ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो, हीच विनम्र प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली!
– पत्रकार, राधिका सांबरेकर
Belgaum Varta Belgaum Varta