


विजापूर : कृष्णा खोऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अलमट्टी धरण जवळपास पूर्ण क्षमतेने भरले असून, प्रथमच धरणाचे सर्व 26 दरवाजे उघडून कृष्णा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून संबंधित यंत्रणा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
सध्या अलमट्टी धरणात सुमारे 118 टीएमसी पाणीसाठा असून धरणाची पाणीपातळी 519.34 मीटर इतकी झाली आहे. विजापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कृष्णा नदीच्या खोऱ्यात होत असलेल्या जोरदार पावसामुळे धरणात पाण्याची आवक सातत्याने वाढत आहे.
धरणात सध्या 81,361 क्युसेक पाण्याची आवक होत असून, जलविद्युत केंद्र आणि धरणाच्या 26 दरवाज्यांमधून मिळून सुमारे 1 लाख 10 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग कृष्णा नदीत करण्यात येत आहे.
पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातील पाण्याची आवक आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे धरणातील जलपातळी, आवक आणि विसर्ग यावर जलसंपदा विभागाचे अधिकारी सातत्याने लक्ष ठेवून असून, नदीकाठच्या नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta