Monday , August 17 2026
Breaking News

तब्बल १.९६ कोटींचा आर्थिक घोटाळा; सांबरा येथील यशवंत को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या सेक्रेटरीविरुद्ध गुन्हा

Spread the love

 

 

बेळगाव : सांबरा येथील यशवंत को-ऑपरेटिव्ह सोसायटीत तब्बल १ कोटी ९६ लाख रुपयांहून अधिक रकमेचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले असून, या प्रकरणी सोसायटीचे तत्कालीन सेक्रेटरी भुजंग केदारी जोई (रा. सांबरा) यांच्याविरुद्ध मारीहाळ पोलीस ठाण्यात फसवणूक व बनावट कागदपत्रांचा वापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने सांबरा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सोसायटीचे अध्यक्ष दिलीपकुमार चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत फसवणूक व बनावट कागदपत्र तयार करून त्यांचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून, मारीहाळ पोलीस सखोल तपास करत आहेत.

फिर्यादीनुसार, २० एप्रिल २०१२ ते १६ डिसेंबर २०२३ या कालावधीत भुजंग जोई यांनी सेक्रेटरी म्हणून कार्यरत असताना संस्थेच्या आर्थिक व्यवहारांमध्ये गंभीर अनियमितता केली. मंगळवार पेठ, सांबरा येथील यशवंत विविध उद्देशीय स्व-सहाय्य संघाच्या आर्थिक व्यवहारांची जबाबदारी त्यांच्याकडे असताना त्यांनी विश्वासाला तडा दिल्याचा आरोप आहे.

तपासात धक्कादायक बाबी समोर आल्या असून, सोसायटीतील १९ खातेधारकांच्या मुदतठेव प्रमाणपत्रांचा गैरवापर करून अध्यक्षांच्या बनावट स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. ही प्रमाणपत्रे गहाण ठेवून खाजगी सावकारांकडून ५९ लाख १२ हजार रुपयांचे कर्ज उचलण्यात आले. तसेच विविध मार्गांनी उभारलेली मोठी रक्कम सोसायटीच्या खात्यात जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या प्रकरणातील गैरव्यवहाराची एकूण रक्कम १ कोटी ९६ लाख रुपयांहून अधिक असल्याचे समोर आले असून, या आर्थिक घोटाळ्यात आणखी कोणी सहभागी आहे का, याचाही तपास मारीहाळ पोलीस करत आहेत. या प्रकरणामुळे सहकारी संस्थांच्या आर्थिक व्यवहारांच्या पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

About Belgaum Varta

Check Also

तारांगण व विश्वभारत सेवा समितीचे दुसरे बालकवी संमेलन 18 ऑगस्टला

Spread the love  बेळगांव : तारांगण व विश्वभारत सेवा समितीच्या संयुक्त विद्यमाने दुसरे बालकवी संमेलन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *