


बेळगाव : युनियन जिमखाना येथील रमी क्लबमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी प्रफुल्ल पाटीलसह आणखी दोघे संशयित अद्याप फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी कॅम्प पोलिसांनी विशेष पथके तैनात केली आहेत. या प्रकरणात आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली असून, त्यापैकी दोघे पुणे येथील आहेत.
गोळीबारानंतर आरोपी पुण्याकडे पसार झाल्याची माहिती समोर आल्यानंतर कॅम्प पोलिसांनी तेथे तपासाची चक्रे फिरवत कारवाई केली. या मोहिमेत साहिल संतोष नांगडे (वय 23, रा. पुणे) याला अटक करण्यात आली. यापूर्वी रोहन पोकळे आणि आदित्य सुतार यांना अटक करण्यात आली होती.
या कारवाईनंतर अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या तीनवर पोहोचली आहे. मात्र, या गुन्ह्याचा सूत्रधार मानला जाणारा प्रमुख आरोपी प्रफुल्ल पाटील आणि त्याचा आणखी एक साथीदार अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. फरार आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू असून, त्यांना लवकरच अटक होईल, असा विश्वास तपास यंत्रणेकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta