


बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यात जालिक्कोप्प गावाजवळ भरधाव कारने मेंढ्यांच्या कळपाला जोरदार धडक दिल्याने 48 मेंढ्या जागीच ठार झाल्या, तर 15 हून अधिक मेंढ्या गंभीर जखमी झाल्या. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बैलहोंगलहून बेलवडीकडे भरधाव वेगाने जात असलेल्या कारने रस्ता ओलांडत असलेल्या मेंढ्यांच्या कळपावर अचानक धडक दिली. या धडकेत अनेक मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर जखमी मेंढ्या रस्त्यावर तडफडत असल्याचे हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळाले.
मृत मेंढ्या केंगानूर येथील चंद्रप्पा हित्तलमणी आणि दोडवाड येथील बिरप्पा यांच्या मालकीच्या असल्याचे समजते. अपघातात अनेक गाभण मेंढ्यांचाही मृत्यू झाला असून, त्यांच्या पोटातील कोकरे बाहेर पडल्याचे विदारक दृश्य पाहून ग्रामस्थांच्या डोळ्यांत अश्रू आले.
या दुर्घटनेत मेंढपाळांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, निष्काळजी कारचालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी मेंढ्यांच्या मालकांनी केली आहे.
अपघातानंतर कारचालक वाहन घटनास्थळी सोडून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच बैलहोंगल पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, गुन्हा दाखल करून फरार चालकाचा शोध सुरू केला आहे.

Belgaum Varta Belgaum Varta